सांगली : जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करतांना शिवसेनेची भूमिका ठरविणारी भाजप कोण असा सवाल शिवसेनेचे नेते व जिल्ह्याचे संपर्क मंत्री शंभूराज देसाई यांनी गुरूवारी सांगलीत पत्रकार बैठकीत उपस्थित केला. महापालिका निवडणुकीवेळी सोयीस्कर भूमिका भाजपने घेतली होती असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
जिल्हा परिषदेची निवडणुकीनंतर सांगली जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यावरून पेच निर्माण झाला आहे. बहुमतासाठी महाविकास आघाडीला एका जागेची गरज आहे, तर भाजपला १३ जागांची गरज आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा परिषदेत महायुतीचीच सत्ता स्थापन होईल असे सांगत असताना शिवसेना शिंदे पक्ष आमच्यासोबत सत्तेत सहभागी असेल असे सांगितले आहे.
या पार्श्वभूमीवर मंत्री देसाई यांनी आयोजित केलेल्या पत्रकार बैठकीत सांगितले, महापालिका निवडणुकीवेळी जागा वाटपाची चर्चा सुरू असताना प्रारंभी आठ जागा देण्याची तयारी दर्शवली. यानंतर दोन जागा देउ केल्या आणि अखेरच्या क्षणी क्षमस्व म्हणून चर्चा थांबवली. तरीही शिवसेनेचे दोन सदस्य निवडून आले. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आमचे सात सदस्य तर पंचायत समितीत १९ सदस्य निवडून आले आहेत.
महापालिका निवडणुकीवेळी भाजपने फसवले. यानंतर आज तागायत चर्चा झालेली नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जमेल तिथे महायुती अन्यथा मैत्रीपूर्ण लढती असे ठरले होते. टोकाची भूमिका घ्यायची नाही असे ठरले असतानाही भाजपने शब्द पाळला नाही. यामुळेच त्यांची सातारा व सांगलीमध्ये अति तिथे माती झाली. एका लुगड्यांने कुणी म्हातारे होत नाही हे त्यांनी लक्षात घ्यावे असा टोमणाही त्यांनी यावेळी मारला.
महापालिकेत सत्तेत सहभागी व्हायचे की नाही, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये काय भूमिका घ्यायची याबाबत आपण नूतन सदस्यांशी चर्चा करणार असून या चर्चेचा अहवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला जाईल. निवडणुकीदरम्यान, भाजपकडून कसा त्रास देण्यात आला त्याचा वृत्तांतही कथन केला जाईल. यावेळी आमदार सुहास बाबर हेही उपस्थित राहतील. सोमवारपर्यंत आम्ही पक्ष प्रमुख उपमुख्यमंत्री शिंदे यांना अहवाल देणार असून त्यानंतरच कुणासोबत सत्तेत सहभागी व्हायचे याबाबत जो आदेश दिला जाईल त्यानुसार शिवसेनेची भूमिका असेल. असेही मंत्री देसाई यांनी सांगितले.
दरम्यान, मंत्री देसाई यांच्या हस्ते जिल्हा परिषदेवर निवडून आलेल्या सात सदस्यांचा आणि १९ पंचायत समिती सदस्यांचा आज सत्कार केला. त्याची मतेही जाणून घेतली. यावेळी आमदार बाबर, जिल्हा प्रमुख बजरंग पाटील, महानगर प्रमुख प्रा. मोहन वनखंडे आदींसह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
