प्रसूतीचा काळ जवळ येऊन ठेपलेला. अशा स्थितीत सासरच्यांनी धक्के देत तिला घराबाहेर काढलेले. माहेरच्यांनीही उंबरठय़ापासून परत पाठवलेले. अशा नाजूक, असहाय स्थितीत तिची मध्यरात्री प्रसूती झाली. करवीरनिवासिनी महालक्ष्मीच्या दारातच तिने लक्ष्मीला जन्म दिला खरा. रात्रीच्या गर्भात हा दुर्दैवाचा खेळ रंगला असताना या घटनेतून समाजाची बधिरता, असंवेदनशील वृत्ती, सरकारी अनास्था, भिकारी महिलांच्या समस्या अशा प्रश्नांची गर्दी झाली. खेरीज, असुरक्षित बाळंतपणामुळे मायलेकींना जंतुसंसर्गाचा धोकाही जाणवत आहे.
कौटुंबिक हिंसाचाराचे अनेक कायदे अस्तित्वात असूनही, स्त्रियांवरील अत्याचार काही कमी होताना दिसत नाहीत. कर्नाटक राज्यातल्या संकेश्वर येथील त्या महिलेला गेल्या पंधरा दिवसांपूर्वी सासरच्या मंडळींनी घराबाहेर काढले होते. त्यानंतर ‘ती’ तिच्या माहेरी गेली. मात्र माहेरातही तिच्या वाटय़ाला तिरस्कारच आला. त्यामुळे तिने नाइलाजाने घरदार सोडले. भटकत असतानाच ती गेल्या चार दिवसांपूर्वी शहरातल्या भवानी मंडपात पोहोचली. गेल्या काही दिवसांपासून उपाशीपोटीच ती गरोदरपणाच्या वेदना सहन करत होती. त्यातच मध्यरात्री अडीचच्या सुमारास तिला जोराच्या प्रसववेदना झाल्या आणि त्यातच तिची सार्वजनिक ठिकाणी प्रसूती झाली. तिच्या रडण्याचा आवाज आल्याने, मंदिरात झोपलेल्या इतर भिकारी महिलांनी तिचे बाळंतपण पूर्ण केले.
दरम्यान, बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. बोच-या थंडीत कुडकुडणा-या बाळाला आणि त्याच्या आईला पाहून इतरांना कोणताही मायेचा पाझर फुटला नाही, की तिच्याकडे कोणी साधे ढुंकूनही पाहिले नाही. मात्र एका सामाजिक कार्यकर्त्याने हा प्रकार लक्षात आल्यानंतर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ. दिलीप पाटील यांना माहिती दिली. या नाजूक क्षणी आरोग्य अधिका-यांना कायदा आठवला. त्यांनी माहिती देणा-याकडे मदत करण्याऐवजी पोलीस ठाण्यात जाण्याचा सल्ला देऊन आपल्या दिलदारीचा प्रत्यय आणून दिला. त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयाशी संपर्क साधला असता, अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी या प्रकरणाची तत्काळ दखल घेत, रुग्णवाहिका पाठवून दिली आणि ‘ती’ला रुग्णालयात दाखल करून घेतले.