कोल्हापूर : भात टोकणीसाठी शेतात गेल्यानंतर झालेल्या किरकोळ वादातून वृद्ध आईचा मुलाने डोक्यात कुदळ मारून ठार केल्याची खळबळजनक घटना राधानगरी तालुक्यातील बारडवाडी येथे घडली आहे. मालुबाई मुसळे असे मृत महिलेचे नाव असून मुलगा संदीप याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बारडवाडी येथील श्रीपती मुसळे, मालुबाई मुसळे हे पती-पत्नी, त्यांची सून आणि मुलगा संदीप हे भात टोकण करण्यासाठी सुतारकीचा माळ इथल्या शेतात गेले होते. काम करता करता मुलगा आणि आई यांच्यात वाद झाला. या वादातून संदीप याने कुदळ घेऊन आईच्या डोक्यात मारली. डोक्यात वर्मी घाव लागल्याने आईचा जागीच मृत्यु झाला.

आणखी वाचा-नृसिंहवाडीत १६ जानेवारीला पूर परिषदेचे आयोजन

ही घटना पोलिसांना कळवल्यानंतर पोलीस उपाधीक्षक आप्पासाहेब पवार, राधानगरीचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्यासह राधानगरी पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचले. सोळांकुर इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविछेदन केल्यानंतर मृतदेह रात्री उशिरा नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान पोलिसांनी मुलगा संदीप मुसळे याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. किरकोळ कारणातून माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घडलेल्या या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.