कोल्हापूर : विठू माउलीच्या अखंड नामजपात शहर व परिसरातील वारकऱ्यांनी प्रति पंढरपूर नंदवाळच्या वारीत उपस्थिती लावली होती. करोनाच्या पार्श्वभूमीवर छोटेखानी स्वरूपात ही  वारी पार पडली. वारकऱ्यांना ‘करोना काळात जगण्याचे बळ दे’ असे साकडे पांडुरंगाला घातले.

आषाढी एकादशी निमित्त आज मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिरात यथासांग विठ्ठलाची पूजा करण्यात आली. फुलांनी सुशोभित केलेली बस, पावसाच्या सरीत टाळचिपळ्यांच्या निनादात अखंड विठू नामाचा जप करणारे वारकरी, डोक्यावर  वृंदावन घेतलेल्या सुवासिनी आणि रस्त्याच्या पालखी समोर पाणी घालणारे भक्त.. अशा थाटात पालखीने नंदवाळकडे प्रस्थान केले. वसंतराव देशमुख, रणवीर शिर्के यांच्या हस्ते विठ्ठलाची आरती तर जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे प्रमोद जाधव, विश्व हिंदू परिषदेचे अ‍ॅड. रणजितसिंह घाटगे यांच्या हस्ते अश्वपूजन करण्यात आले. मंदिरातच छोटेखानी रिंगण सोहळा रंगला.   करोनामुळे कोल्हापुरातून ही वारी पायी न करता ठरावीक वारकऱ्यांसह बसने आयोजित केली होती. बिनखांबी गणेश मंदिर, उभा मारुती चौक ते खंडोबा तालीम येथपर्यंतच पायी वारीला परवानगी असल्याने त्यानंतरची वारी बसद्वारा करण्यात आली. वारीचे आयोजन ज्ञानेश्वर माउली पालखी सोहळा भक्त मंडळ आणि जयशिवराय फुटबॉल प्लेअर तरुण मंडळ आणि राधेय ग्रुपने केले होते.