कोल्हापूर : रोममधील ऑलिम्पिक स्टेडियमची अप्रतिम प्रतिकृती असलेल्या येथील ऐतिहासिक राजर्षी शाहू खासबाग मैदानाची दुरवस्था झाल्याने सोमवारी या विरोधात मल्लांनी थेट आखाड्यातच दंड थोपटले. मैदानाच्या दुरवस्थेबाबत कोल्हापूर महापालिकेवर तीव्र संताप व्यक्त करत प्रशासनावर धोबीपछाड करण्याचा प्रयत्न केला.कोल्हापुरातील काही ऐतिहासिक वास्तू राज्यातच नव्हे तर देशातही प्रसिद्ध आहेत.

राजर्षी शाहू महाराज यांनी रोमच्या दौऱ्यानंतर बांधलेले खासबाग मैदान आणि त्याला लागून असलेले केशवराव भोसले नाट्यगृह यांच्या रचना पाहणाऱ्यांना मोहात पाडणाऱ्या आहेत. गतवर्षी केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागून त्याची राखरांगोळी झाली. बाजूला असलेल्या खासबाग कुस्ती मैदानाकडे कोल्हापूर महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.

या परिसराची मोठी दुरवस्था झाली असल्याने त्या विरोधातील संताप आज उफाळून आला. मल्ल, वस्ताद, कुस्ती शौकीन तसेच नागरिकांनी खासबाग कुस्ती मैदान बचाव मोहिमेअंतर्गत खासबाग मैदानात घोषणाबाजी केली. आंदोलनाची दखल घेऊन अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ मैदानात आल्यावर त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करण्यात आला. लवकरात लवकर मैदानाची स्वच्छता करावी, आवश्यक सुविधा निर्माण करून पैलवानांना सरावासाठी खुले करावे, अशी मागणी करणारे निवेदन देण्यात आले.

माजी नगरसेवक विजय साळोखे सरदार, खासबाग केसरी कुस्ती मैदानाचे संयोजक संग्राम कांबळे, संभाजी वरुटे, बाबा महाडिक, मारुती जाधव, माउली जमदाडे, उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर, वस्ताद अशोक माने, कालीचरण सोलणकर, सीताराम कांबळे, कुलदीप कांबळे, कृष्णात पाटील यांच्यासह जिल्ह्यातील वस्ताद, पैलवान, नागरिक सहभागी झाले होते.

मागण्या कोणत्या?

खासबाग कुस्ती मैदान बचाव मोहिमेअंतर्गत आंदोलन करताना आंदोलकांनी महापालिका प्रशासनाकडे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या. मैदानात मोठ्या प्रमाणात झुडपे उगलेली आहेत. दर्शनी भागाच्या तटबंदीची पडझड झाली असून काही भिंती कमकुवत झालेल्या आहेत. मुख्य आखाड्यात बांधकामाचे दगड, लोखंडी साहित्य पडलेले असल्याने मल्लांचा सराव थांबलेला आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने या ठिकाणी स्वच्छतेसह तटबंदीची दुरुस्ती करावी. पाण्याची सोय करावी, रात्री पहारेकऱ्यांची नेमणूक करावी अशा मागण्या करण्यात आल्या.

या मैदानात सीसीटीव्ही बसवावा अशी अनेक वर्षाची मागणी आहे. वेळीच सीसीटीव्ही बसवला असता तर आगीचे नेमके कारण समजले असते. त्यामुळे ही मागणीही पूर्ण करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली. वेळेत या मैदानाची दुरुस्ती झाली नाही तर महापालिकेसमोर राज्यातील पैलवांनासह मोठे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी दोनच दिवसांत प्राथमिक मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.