कोल्हापूर : सुतामधील भेसळ, त्याचा कापड उत्पादनावर होणारा विपरीत परिणाम, कापड खरेदीदारांच्या तक्रारी असा अनिष्ट क्रम वाढत चालल्याने आता केंद्रीय वस्त्रोद्योग आयुक्तालयाकडून सुतामध्ये भेसळ करणाऱ्या व्यापाऱ्यांवर थेट बंदी घालण्यापर्यंत कठोर कारवाई केली जाणार आहे. या सक्त अंमलबजावणीचे यंत्रमागधारकांनी स्वागत केले आहे.
राज्यातील यंत्रमाग केंद्रामध्ये सुतामध्ये विस्कोस फायबर, लायसेल फायबर मिसळले जात असल्याने विणल्या जाणाऱ्या कापडावर पट्टे पडणे, रंगात तफावत यासारखे गंभीर दोष होत असल्याच्या तक्रारी यंत्रमागधाकांकडून मोठ्या प्रमाणात येत होत्या. या आधारे दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनने २ एप्रिल रोजी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाकडे तक्रार केली होती. त्यामध्ये यंत्रमागधारकांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे, कापड खरेदीत लक्षणीय घट झाली असल्याची नमुद केले होते. हा मुद्दा लोकसत्ताने गेल्या आठवड्यात उघडकीस आणला होता.
याचे गांभीर्य लक्षात घेऊन वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे सहाय्यक संचालक विकास गुप्ता, इतर सहकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी इचलकरंजीस भेट देऊन सूत व्यापारी संघटना आणि यंत्रमागधारक प्रतिनिधींसह इतर घटकांशी संवाद साधला असता यंत्रमागधारकांनी सूतामध्ये भेसळ होत असल्याच्या तक्रारीचा सूर कायम ठेवला. या निरिक्षणाच्या आधारे संबंधीत पथकाला सूताच्या गुणवत्तेतील तफावत, कृत्रिम धाग्याच्या भेसळीमुळे कापड निर्मिती क्षेत्रामध्ये गंभीर दोष निर्माण झाल्याचे आढळून आले. त्या आधारे वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे संचालक सतीश सिंग यांनी सूतात भेसळ करणाऱ्या व्यापाऱ्यां विरोधातील कारवाईचे स्वरूप स्पष्ट केले आहे.
त्यानुसार, वस्त्रआयुक्त कार्यालयाकडे पूर्वी स्वदेशी उत्पादित आणि आयात केलेल्या वस्त्रांच्या (टॉप्स, सूत आणि कापड) यांच्यासंदर्भात वस्त्र (ग्राहक संरक्षण) विनियम १९८८ च्या नियमांचे पालन आणि शोध क्षमता सुनिश्चित करणेसाठी व्यापाऱ्यांच्या आवारात नियमीत तपासणी आणि अचानक नमुना तपासणी केली जाणार आहे.
सूत दर्जाच्या नोंदी न ठेवणे हे एक गंभीर उल्लंघन मानले जाणार आहे. हेतू पुरस्पर फसवणूक, चुकीचे लेबल लावणे, निकृष्ठ दर्जाच्या – मिश्रीत धाग्याचा पुरवठा प्रकरणी भारतीय दंड संहिता १८६० च्या संबंधीत तरतुदींनुसार कायदेशीर कारवाई सुरू केली जाणार आहे. बाजारपेठेतील कामाकाजावर निर्बंध किंवा बंदी घालण्याचा समावेश यामध्ये आहे. या उपाय योजनांमुळे उत्तरदाईत्व, पारदर्शकता वाढेल तसेच अनुचीत व्यापार प्रथांविरूद्ध एक प्रतिबंधक उपाय म्हणून कारवाई केली जाणार आहे असे वस्त्रोद्योग संचालक सतीश कुमार सिंग यांची भूमिका आहे.
वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या पत्रातील कडक कारवाईच्या भूमिकेचे स्वागत करीत आहोत असा उल्लेख करून चंद्रकांत पाटील यांनी सूतामध्ये भेसळ करणाऱ्या प्रवृत्तीला चाप बसेल आणि यंत्रमागधारकांना गुणवत्तापूर्ण सूत बाजारात उपलब्ध होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.
