डावाच्या शेवटच्या टप्प्यात दडपणाखाली विश्वनाथन आनंदकडून अक्षम्य चुका होतात, याचाच प्रत्यय विश्व अजिंक्यपद बुद्धिबळ स्पध्रेच्या दुसऱ्या डावात पाहायला मिळाला. त्याचा पुरेपूर फायदा घेत मॅग्नस कार्लसनने केवळ ३५ चालींमध्ये विजय मिळवत विश्वविजेतेपदाच्या लढतीत १.५-०.५ अशी आघाडी घेतली.k06
कार्लसन हा आनंदपेक्षा २० वर्षांनी तरुण आहे. नेमकी हीच गोष्ट कार्लसनच्या पथ्यावर पडली आहे. पहिल्या डावात दडपणाखाली चांगली स्थिती असताना आनंदने डाव बरोबरीत ठेवण्यावर समाधान मानले होते. त्याला पांढऱ्या मोहऱ्यांचा अपेक्षेइतका लाभ घेता आला नव्हता. वैविध्यपूर्ण तंत्र खेळण्यात माहीर असलेल्या कार्लसनने अतिशय कल्पक व्यूहरचना करीत आनंदच्या मर्यादा स्पष्ट केल्या.
पांढऱ्या मोहरांनी खेळणाऱ्या कार्लसनने रॉय लोपेझ तंत्राचा उपयोग केला. आनंदने त्यास बर्लिन बचावाने उत्तर दिले. पाचव्या चालीला कार्लसनने कॅसलिंग केले. त्यापाठोपाठ आनंदनेही राजाच्या बाजूला कॅसलिंग केले. सुरुवातीच्या मोहरे घेण्याच्या डावपेचांनंतर डावाच्या मध्यावर कार्लसनने घोडा, वजीर व हत्ती यांच्या साहाय्याने आनंदवर जोरदार चाल केली. त्याची ही चाल रोखण्याच्या प्रयत्नात आनंदवर खूप दडपण आले. त्यातच त्याचे एक प्यादे अधांतरी व कमकुवत झाल्यामुळे हे प्यादे असून नसल्यासारखेच झाले. कार्लसनने एकाच रांगेत दोन हत्ती व वजीर यांच्या साहाय्याने पुन्हा एकदा धारदार चाल केली. आनंदने एका हत्तीला हत्ती दिला. पाठोपाठ त्याने आपले प्यादे पुढे नेत कार्लसनच्या राजाला शह दिला. कार्लसनने आपले प्यादे पुढे नेत हा शह रोखला. मात्र हत्तीच्या घरातील प्याद्याची अनावश्यक चाल करताना आणखी तीन-चार चालींमध्ये आपला पराभव होण्याची शक्यता आहे, हे आनंदच्या लक्षातच आले नाही. कार्लसनने वजीर आपल्या हत्तीच्या रेषेत आणला. पुढच्या चालीला आपल्यावर शहमात होणार किंवा ही मात रोखण्यासाठी वजिराचा बळी देत आणखी आपली बाजू कमकुवत होणार हे लक्षात येताच आनंदने पराभव मान्य केला. डावाच्या शेवटच्या टप्प्यात अनेक वेळा आनंदला आपल्या चालींवर नियंत्रण ठेवता आले नाही. त्याचप्रमाणे बर्लिन बचावाचे तंत्र त्याला फारसे रुचलेले नाही, हेही येथे दिसून आले.