इंग्लंडचे माजी कर्णधार माइक गॅटिंग यांना चिंता

मुंबई : जगभरात वाढणाऱ्या टेन-१० लीग अथवा १०० चेंडूंचे सामने क्रिकेटसाठी धोकादायक ठरतील. एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटला त्यांचा मोठा फटका बसू शकतो, असा सावधगिरीचा इशारा इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू माइक गॅटिंग यांनी गुरुवारी दिला आहे.

‘फॉच्र्युन टर्नर्स’ या भारताच्या माजी फिरकी गोलंदाजांवर आधारित खास पुस्तकाचे अनावरण गॅटिंग यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी क्रिकेटच्या वाढत्या ट्वेन्टी लीगविषयी चिंता व्यक्त केली. ‘‘माझ्यासाठी एकदिवसीय आणि कसोटी हेच क्रिकेटचे खरे प्रकार आहेत. २० षटकांचे सामनेसुद्धा मर्यादित काळापर्यंत पाहणे योग्य वाटतात. परंतु सध्या जवळपास प्रत्येक देशाची ट्वेन्टी-२० लीग खेळवण्यात येते. त्याहूनही निराशाजनक म्हणजे १० षटकांचे अथवा १०० चेंडूंचे सामन्यांचे आयोजन करणे. यांसारख्या प्रकारामुळे चाहत्यांमध्ये आणि खेळाडूंमध्ये कसोटीविषयीचे प्रेम कमी होण्याची भीती आहे,’’ असे गॅटिंग म्हणाले.

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडला बहाल करण्यात आलेल्या ओव्हर-थ्रोच्या धावा आणि सर्वाधिक सीमापार फटक्यांच्या निर्णयाविषयी तुम्हाला काय वाटते, असे विचारले असता गॅटिंग म्हणाले, ‘‘विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात घेण्यात आलेल्या त्या निर्णयांविषयी मी काहीही बोलणे चुकीचे ठरेल. परंतु न्यूझीलंडने ज्याप्रकारे पराभव स्वीकारला, ते पाहून त्यांना सलाम ठोकावासा वाटतो.’’

याव्यतिरिक्त पंचगिरीचा खालावलेला दर्जा आणि बेल्स नाटय़ाविषयीसुद्धा गॅटिंग यांनी त्यांचे मत मांडले. ‘‘विश्वातील सर्वोत्कृष्ट पंच देशाच्या कानाकोपऱ्यात होणाऱ्या प्रत्येक सामन्यात पंचाची भूमिका बजावण्यासाठी पोहोचू शकत नाही. त्यामुळे कुठे ना, कुठे तुम्हाला सदोष पंचगिरीचा फटका पडणारच. मात्र पंचांनी तंत्रज्ञानाचा अधिक वापर करून अचूक निर्णय देण्याची अपेक्षा आपण नक्कीच करू शकतो. बेल्सच्या बाबतीत ‘आयसीसी’ कमी वजनाचे बेल्स वापरू शकते अथवा किमान बेल्समधील दिवे जळाले तरी फलंदाजाला बाद देण्यात यावे, अशा प्रकारचे काही बदल करता येऊ शकतात,’’ असेही गॅटिंग यांनी सांगितले. त्याशिवाय कसोटी सामन्यात खेळाडूंच्या जर्सीवर क्रमांक आणि नाव टाकण्याच्या नियमाचे गॅटिंग यांनी समर्थन केले.

कोहली आणि लायन सर्वोत्तम!

ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी पहिल्या अ‍ॅशेस सामन्यानंतर स्टीव्ह स्मिथ हा सध्याच्या घडीला भारताच्या विराट कोहलीपेक्षा वरचढ आहे, असे म्हटले होते. परंतु गॅटिंग यांनी मात्र कोहलीलाच सर्वोत्तम मानले आहे. ‘‘स्मिथ हा एक अव्वल दर्जाचा खेळाडू आहे, यात काहीही शंका नाही. परंतु माझ्यासाठी ‘सर्वोत्तम चार’पैकी किंबहुना विश्वातील सर्वोत्तम फलंदाजांच्या शर्यतीत कोहलीच अग्रस्थानी आहे. अन्य फलंदाज कोणत्याही एका अथवा दोन प्रकारात सातत्याने धावा करतात. परंतु कोहली क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात समान सरासरीने सातत्याने धावा करतो,’’ असे गॅटिंग म्हणाले. त्याशिवाय सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलियाचा नॅथन लायन हा विश्वातील सर्वोत्तम फिरकी गोलंदाज आहे, असेही गॅटिंग यांनी सांगितले.