2018 हे वर्ष भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीसाठी फारसं चांगलं गेलेलं नाही. आपल्या संथ खेळीमुळे धोनीला अनेकदा टीकेला सामोरं जावं लागलं. काही सामन्यांमध्ये धोनीची संथ खेळी भारताला भोवलीसुद्धा, यावेळी अनेक माजी खेळाडूंनी धोनीला निवृत्तीचाही सल्ला दिला. मात्र या सर्व परिस्थितीमध्ये धोनीचे चाहते हे त्याच्यामागे ठामपणे उभे होते. धोनीचा फलंदाजीतला फॉर्म हरवला असला तरीही त्याचं यष्टीरक्षण व संघातला त्याचा वावर हा नक्कीच महत्वाचा होता. आपल्या उमेदीच्या काळात धोनी हा भारतीय संघाचा सर्वोत्तम फिनीशन म्हणून ओळखला जायचा.

त्याचा खेळ कितीही संथ झाल्याची टीका झाली तरीही आकडेवारी काही वेगळचं सांगतेय. 2009 साली धोनीची फलंदाजीतली सरासरी आणि 2019 सालची धोनीची फलंदाजीतली सरासरी ही जवळपास मिळतीजुळतीच आहे. पाकिस्तानचे क्रिकेट समीक्षक मझर अर्शद यांनी धोनीची एक आश्चर्यकारक सरासरी समोर आणली आहे.

2018 सालात धोनीच्या नावावर 20 वन-डे सामन्यांमध्ये केवळ 275 धावा जमा होत्या. 2019 साली वन-डे विश्वचषक लक्षात घेता धोनीचं फॉर्मात येणं भारतीय संघासाठी अत्यंत गरजेचं होतं. नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत धोनीने पुन्हा एकदा आपल्या जुन्या फॉर्मात येत, आपल्यात क्रिकेट अजुन बाकी असल्याचं दाखवून दिलं. धोनीने 3 वन-डे सामन्यात 3 अर्धशतकं झळकावत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. अंतिम फेरीत धोनीने केदार जाधवसोबत शतकी भागीदारी करत भारताला मालिका विजय मिळवून दिला. या कामगिरीसाठी धोनीला मालिकावीराचा किताबही देण्यात आला. कसोटी मालिकेसह वन-डे मालिकेतही भारताने ऑस्ट्रेलियावर 2-1 ने विजय मिळवला.