परदेशी विनिमय कायद्यातील नियमावलीचा भंग केल्याबद्दल राजस्थान रॉयल्स या आयपीएल फ्रँचाईजीला अंमलबजावणी संचालनालयाने शंभर कोटी रुपयांचा दंड केला आहे.
विदेश विनिमय व्यवस्थापन कायद्याचा (फेमा) भंग केल्याप्रकरणी राजस्थान रॉयल्सला तीन कारणे दाखवा नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. ९८ कोटी ५० लाख रुपयांचा दंड तुमच्याकडून का वसूल करू नये, अशी विचारणा त्यांना करण्यात आली आहे. त्यापैकी जयपूर आयपीएल क्रिकेट कंपनी तसेच राजस्थान रॉयल्सच्या अन्य संचालकांना ५० कोटी रुपयांच्या दंडाची नोटीस देण्यात आली आहे. तसेच ईएम स्पोर्टिग होल्डिंग (मॉरिशस) कंपनी व त्याच्या संचालकांना ३४ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याच संदर्भात मेसर्स एनडी इन्व्हेस्टमेंट्स (इंग्लंड) यांना १४ कोटी ५० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
या नोटिशीविरुद्ध अपील करण्याची संधी या तीनही कंपन्यांना देण्यात आली आहे अन्यथा ४५ दिवसांमध्ये हा दंड भरावयाचा आहे.
आयपीएलच्या विविध फ्रँजाईजींकडून फेमा कायद्याचा भंग झाला आहे काय याची खातरजमा करुन घेण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाने दोन वर्षांपूर्वीपासून तपासास सुरुवात केली आहे. त्यांचा पहिलाच दणका राजस्थान रॉयल्सला बसला आहे.