सूर्यापेठ (तेलंगण) येथे सोमवारी ४७व्या कुमार-कुमारी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेला प्रारंभ होण्यापूर्वी प्रेक्षक गॅलरी कोसळून झालेल्या अपघातात १०० जण जखमी झाले असून, यापैकी २० जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

स्पर्धेतील सामन्यांना प्रारंभ करण्यापूर्वी संघांच्या संचलनासाठी पुकार दिला जात असताना व्यासपीठाच्या पलीकडची तिसऱ्या क्रमांकाची प्रेक्षक गॅलरी सायंकाळी ६.३० वाजता कोसळून हा अपघात झाला. सुमारे दीड हजार प्रेक्षकांची उपस्थिती असलेली ही गॅलरी कोसळल्यानंतर जखमींना वाचवण्यासाठी वेगाने बचावकार्य सुरू झाले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी महाराष्ट्र संघाचे व्यवस्थापक मनोज ठाकूर यांनी दिली. जखमी प्रेक्षकांना त्वरित सूर्यापेठ परिसरातील इस्पितळात दाखल करण्यात आले असून यापैकी काही जणांना हैदराबादच्या इस्पितळात हलवण्यात आले आहे. लाकडाच्या कृत्रिम प्रेक्षक गॅलरीत क्षमतेहून अधिक प्रेक्षक बसल्यामुळे ती खचली. त्यामुळे हा अपघात झाला असून याबाबतची चौकशी सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.

‘‘महाराष्ट्राचा संघ मैदानाबाहेरील उपाहारगृहात नाश्ता करीत असताना हा अपघात घडला. दोन्ही संघांतील सर्व खेळाडू आणि मार्गदर्शक सुखरूप आहेत. या घटनेनंतर आम्ही खेळाडूंचे समुपदेशन केले,’’ असे प्रशिक्षक प्रशांत भाबड यांनी सांगितले.

‘‘स्पर्धेच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुण्यांची प्रतीक्षा सुरू असताना हा अपघात घडला. खेळाडूंना संचलनाकरिता मैदानाबाहेर ठेवल्याने मोठी हानी टळली. परंतु स्पर्धेच्या कार्यक्रमपत्रिकेतील पहिल्या दिवसाच्या सामन्यांवर त्याचा परिणाम होईल. त्यामुळे काही सामने दुसऱ्या दिवशी अतिरिक्त सत्रात खेळवण्यात येतील,’’ अशी माहिती भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या पंच समन्वय समितीचे प्रमुख विश्वास मोरे यांनी दिली.