एपी, टोक्यो

टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पध्रेसाठी जपानमधील १० हजार प्रेक्षकांना स्टेडियममध्ये उपस्थित राहता येईल, असे स्थानिक संयोजन समिती आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) सोमवारी स्पष्ट केले.

सर्व ऑलिम्पिक स्टेडियममध्ये प्रेक्षकक्षमतेच्या ५० टक्के आणि जास्तीत जास्त १० हजार प्रेक्षकांना हजर राहता येईल, असे संयोजकांनी स्पष्ट केले आहे. स्थानिक संयोजन समिती, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती, आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समिती, जपान सरकार आणि टोक्यो महानगर सरकार यांच्या प्रतिनिधींच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.

ऑलिम्पिकपासून प्रेक्षकांना दूर ठेवावे, अशी सूचना जपानमधील प्रख्यात वैद्यकीय सल्लागार डॉ. शिगेरू ओमी यांनी केली होती. करोना साथीच्या काळात ऑलिम्पिकच्या आयोजनावरही त्यांनी टीका केली होती. २३ जुलैपासून टोक्योमध्ये ऑलिम्पिकला प्रारंभ होणार आहे. या स्पध्रेसाठी परदेशी प्रेक्षकांना मज्जाव करण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वीच घेण्यात आला आहे.

३६ ते ३७ लाख तिकिटे जपानमधील नागरिकांसाठी उपलब्ध आहेत, असे संयोजन समितीने स्पष्ट केले आहे. प्रेक्षकांना परवानगी देण्याच्या निर्णयास पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनीही अनुकूलता दर्शवली आहे. ‘‘आणीबाणी असली तरी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये हजर राहण्यासाठी काही नियम शिथिल केले जातील. नागरिकांच्या सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य असेल,’’ असे सुगा यांनी म्हटले आहे.

ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा ऑलिम्पिक धोकादायक!

जपानमधील एका सर्वेक्षणात ८३ टक्के नागरिकांनी ऑलिम्पिकमुळे करोनाची साथ पसरण्याचा धोका आहे, असे म्हटले आहे. यापैकी ५३ टक्के नागरिकांनी प्रेक्षकांविना ऑलिम्पिक व्हावे असा कौल दिला आहे, तर प्रेक्षकक्षमता मर्यादित असावी, असे ४२ टक्के नागरिकांनी म्हटले आहे.

प्रेक्षकांसाठी नियम

१. खेळ शांतपणे पाहावा.

२. मुखपट्टी वापरणे बंधनकारक.

३. खेळ संपल्यावर थेट घरी जावे.