News Flash

…म्हणून ११ जून १९७५ हा दिवस ‘टीम इंडिया’साठी आहे खास

तुम्हाला माहिती आहे का या दिवसाचं वैशिष्ट्य?

टीम इंडियाने आतापर्यंत क्रिकेटच्या इतिहासात एकूण तीन वेळा विश्वचषकावर नाव कोरलं आहे. १९८३ साली भारताने कपिल देवच्या नेतृत्वाखाली वन डे विश्वचषक उंचावला. तर त्यानंतर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली २००७ ला टी २० विश्वचषक आणि २०११ साली दुसरा वन डे विश्वचषकावर भारताने नाव कोरले. हे तीनही दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहेतच. पण त्याचसोबत ११ जून १९७५ या दिवसाला भारतीय क्रिकेटमध्ये खास महत्त्व आहे.

१९७५ मध्ये पहिल्यावहिल्या क्रिकेट विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेआधी भारताने १९७४ मध्ये इंग्लंडविरुद्द दोन वन डे सामने खेळले होते, ज्यात भारत पराभूत झाला होता. श्रीनिवासराघवन व्यंकटराघवन यांच्या नेतृत्वाखाली भारताने विश्वचषक स्पर्धेत सहभाग घेतला होता. स्पर्धेत आठ संघ होते. १९७५ च्या विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध भारताला २०२ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले होते. पण त्यानंतर झालेल्या पूर्व आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारताने जोरदार पुनरागमन करत वन डे विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील पहिला विजय नोंदविला होता. ती तारीख होती ११ जून १९७५…

लिटल मास्टर सुनील गावसकर

असा रंगला होता सामना

१९७५ च्या स्पर्धेत वन डे सामने ६०-६० षटकांचे खेळवले जायचे. संघाच्या सर्व गोलंदाजांना १२-१२ षटके टाकण्याची परवानगी होती. भारताविरूद्धच्या सामन्यात पूर्व आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतासाठी वेगवान गोलंदाज मदन लाल आणि सय्यद अबिद अली यांनी दोन गडी बाद करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्या काळात संघाचा स्टार फिरकी गोलंदाज बिशन सिंग बेदी यानेही दमदार कामगिरी करत आफ्रिकन फलंदाजांना धावा करण्याची फारशी संधीच दिली नाही. बेदीने आपल्या १२ षटकांमध्ये केवळ ६ धावा दिल्या आणि एक बळी टिपला. त्याने ८ षटके निर्धाव टाकली. त्यामुळे पूर्व आफ्रिकेचा संघ १२० धावांवर तंबूत परतला. १२१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाला सुनील गावस्कर आणि फारूक इंजिनिअर या सलामीवीरांनी ३० व्या षटकातच विजय मिळवून दिला आणि सामना १० गडी राखून जिंकवून दिला. गावसकरने नाबाद ६५ तर फारूक इंजिनियरने नाबाद ५४ धावा फटकावल्या.

स्पर्धेत नंतर तिसर्‍या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध भारताला पराभव स्वीकारावा लागला. पुढेही भारतीय संघ स्पर्धेत काही खास कामगिरी करू शकला नाही आणि विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडला. विश्वचषकातील अंतिम सामना इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळला गेला. त्यात अंतिम सामन्यात इंग्लंडला १७ धावांनी पराभूत करत वेस्ट इंडिजने पहिलावहिला विश्वचषक जिंकला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2020 5:21 pm

Web Title: 11 june 1975 special day for indian cricket as team india registered its first ever one day world cup history sunil gavaskar kapil dev bishan singh bedi icc vjb 91
Next Stories
1 Video : लॉकडाउनमध्ये रोहित शर्मा ‘ही’ गोष्ट करतोय मिस
2 वसिम जाफरच्या वन डे संघातून सेहवाग आऊट, कारण…
3 जगण्यासाठी धडपड… राष्ट्रीय सुवर्णपदक विजेत्यावर आली विहीर खोदण्याची, कोंबडीचे मांस विकण्याची वेळ
Just Now!
X