20 January 2019

News Flash

आयपीएल लिलावामध्ये ११२२ क्रिकेटपटूंचा समावेश

यंदाच्या हंगामामध्ये तब्बल ११२२ क्रिकेटपटूंचा लिलावात समावेश आहे.

आयपीएल लिलाव प्रक्रिया २७ आणि २८ जानेवारी रोजी बेंगळूरुमध्ये होणार आहे.

भारतीय खेळाडूंमध्ये युवराजसह हरभजन व गंभीर केंद्रस्थानी

इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) अकराव्या हंगामासाठीच्या क्रिकेटपटूंच्या लिलावाचा आराखडा तयार झाला आहे. यंदाच्या हंगामामध्ये तब्बल ११२२ क्रिकेटपटूंचा लिलावात समावेश आहे. भारताच्या क्रिकेटपटूंमध्ये अष्टपैलू युवराज सिंगसह ऑफस्पिनर हरभजन सिंग आणि सलामीवीर गौतम गंभीर तसेच परदेशी क्रिकेटपटूंमध्ये इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूटसह फटकेबाज सलामीवीर ख्रिस गेल आणि इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सला नेमकी किती बोली लागते आणि कुठली फ्रँचायझी करारबद्ध करते, याची उत्सुकता लागून राहिली आहे.

आयपीएल लिलाव प्रक्रिया २७ आणि २८ जानेवारी रोजी बेंगळूरुमध्ये होणार आहे. या प्रक्रियेसाठीच्या क्रिकेटपटूंची यादी बीसीसीआयने शनिवारी जाहीर केली. २०११ एकदिवसीय विश्वचषक विजयी संघातील युवराज, हरभजन आणि गंभीरसह  ऑफस्पिनर आर. अश्विन, मधल्या फळीतील फलंदाज अजिंक्य रहाणे, ‘चायनामन’ फिरकीपटू कुलदीप यादव तसेच सलामीवीर लोकेश राहुल आणि मुरली विजय या भारतीय खेळाडूंकडे फ्रँचायझींचे लक्ष असेल.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंमध्ये गेल, रूट आणि स्टोक्सच्या बोलीबाबत उत्सुकता आहे. मागील हंगामामध्ये स्टोक्स सर्वात महागडा ठरला होता. बेंगळूरु रॉयल चॅलेंजर्सनी गेलला कायम ठेवलेले नाही. ऑस्ट्रेलियातर्फे ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स आणि मिचेल जॉन्सन तसेच वेगवान दुकली मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्सचा लिलावामध्ये समावेश आहे.

इंग्लंडतर्फे रूट, ख्रिस लीन, इयॉन मॉर्गन; वेस्ट इंडिजतर्फे गेलसह ड्वायेन ब्राव्हो, कालरेस ब्राथवेट, इविन लेविस, जेसन होल्डर; दक्षिण आफ्रिकेतर्फे हशिम अमला, फाफ डु प्लेसिस, क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर आणि वेगवान गोलंदाज मॉर्नी मॉर्केल आणि कॅगिसो रबाडा तसेच न्यूझीलंडतर्फे केन विल्यमसन, कॉलिन मुन्रो आणि टॉम लॅथमनेही लिलावात स्थान मिळवले आहे.

अफगाणिस्तानच्या १३ क्रिकेटपटूंचा लिलाव प्रक्रियेत समावेश आहे. बांगलादेशचे आठ, आर्यलड आणि अमेरिकेचे प्रत्येकी दोन, झिम्बाब्वेचे सात क्रिकेटपटू यंदा नशीब अजमावतील.

सहभागी क्रिकेटपटू : ११२२

* आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले : २८१

* आंतरराष्ट्रीय सामने न खेळलेले : ८३८

* आयसीसी संलग्न देशांचे क्रिकेटपटू : ३

* भारताचे नवोदित क्रिकेटपटू : ७७८

परदेशी क्रिकेटपटू : २८२

* ऑस्ट्रेलिया : ५८

* द. आफ्रिका : ५७

* श्रीलंका : ३९

* वेस्ट इंडिज : ३९

* न्यूझीलंड : ३०

* इंग्लंड : २६

प्रमुख आकर्षण

ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स, मिचेल जॉन्सन, मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया). जो रूट, बेन स्टोक्स, इयॉन मॉर्गन (इंग्लंड). ख्रिस गेल, ड्वायेन ब्राव्हो, कालरेस ब्राथवेट (वेस्ट इंडिज). हशिम अमला, फाफ डु प्लेसिस, क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, मॉर्नी मॉर्केल, कॅगिसो रबाडा (द. आफ्रिका). केन विल्यमसन, कॉलिन मुन्रो, टॉम लॅथम (न्यूझीलंड).

First Published on January 14, 2018 1:17 am

Web Title: 1122 cricketers included in ipl auction 2018