ऑस्ट्रेलियाचे पुरुष आणि महिला क्रिकेटपटू करोनाविरूद्धच्या लढाईत भारताला मदत करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. त्यांनी आपल्या देशातील लोकांना युनिसेफ ऑस्ट्रेलियाला दान देण्याचे आवाहन केले आहे. युनिसेफ ऑस्ट्रेलियाने ट्विटरवर एका मिनिटाचा व्हिडिओ पोस्ट केला. भारताची परिस्थिती हेलावणारी असून या कठीण काळात आपण सर्वांनी एकत्र यावे, असे या व्हिडिओ पोस्टमध्ये अ‍ॅलन बॉर्डरसह ऑस्ट्रेलियातील अनेक अव्वल खेळाडूंनी म्हटले आहे.

बॉर्डर यांच्याव्यतिरिक्त पॅट कमिन्स, ब्रेट ली, अ‍ॅलेक्स ब्लॅकवेल, जोश हेझलवुड, मिचेल स्टार्क, माईक हसी, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लाबुशेन, एलिस पेरी, एलिसा हेली, मेग लेनिंग आणि रॅचेल हेन्स हे क्रिकेटपटू व व्हि़डिओमध्ये आवाहन करत आहेत.

 

हे क्रिकेटपटू म्हणाले, “भारतात दर सेकंदाला करोनाचे चार नवीन रुग्ण आढळून येत आहेत. तेथे पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध नाही. या महामारीची ही सर्वात कठीण वेळ आहे. आम्हाला अशा कठीण काळात एकत्र राहावे लागेल. युनिसेफच्या माध्यमातून आम्ही आपला पाठिंबा देत आहोत. त्यांची टीम अद्याप मैदानात आहे आणि गरजूंना आपत्कालीन वस्तू पोहोचवित आहे.”

“कोणीही सर्व काही करु शकत नाही, परंतु प्रत्येकजण थोड्या गोष्टी करू शकतो. या लिंकवर क्लिक करून आमच्यात सामील व्हा. कारण सध्या भारताला आपली गरज आहे. UNICEF.ORG.AU वर जाऊन देणगी द्या.”