थाई किक बॉक्सिंग सामन्यादरम्यान १३ वर्षीय अनुचा थासाको याचा मृत्यू झाला आहे. आठ वर्षांचा असल्यापासून जवळपास १७० बॉक्सिंग सामन्यांमध्ये सहभागी झालेला अनुचा एका चॅरिटी सामन्यादरम्यान जखमी झाला होता. दोन दिवसांनंतर ब्रेन हॅमरेजमुळे त्याचा मृत्यू झाला. किक बॉक्सिंगच्या माध्यमातून अनुचा आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. माहितीसाठी सध्या थाई सरकार एका कायद्यावर विचार करत आहे ज्यामध्ये १२ वर्षाखालील मुलांच्या अशा खेळांवर प्रतिबंध आणण्याचा शिफारस करण्यात आली आहे.

अनुचाने बॉक्सिंग सामन्यादरम्यान हेडगार्ड घातलेलं नव्हतं. खाली कोसळण्याआधी त्याच्या डोक्यावर अनेकवेळा मार बसला होता, ज्यामुळे त्याला गंभीर इजा झाली. सोशल मीडियावर पंचांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. त्यांनी वेळेत सामना रोखला नसल्याचा आरोप होत आहे.

या सामन्यात अनुचाचा स्पर्धक असणाऱ्या १४ वर्षीय खेळाडूचं म्हणणं आहे की, जीव घेण्याचा आपला कोणताही हेतू नव्हता. अनुचाच्या मृत्यूमुळे आपणही दुखी आहोत असं त्याने सांगितलं आहे.