दिवस ४ : वेटलिफ्टिंग

पोखरा (नेपाळ) : दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत गुरुवारी चौथ्या दिवशी भारताने वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारात चार सुवर्णपदकांची कमाई केली. वर्षांच्या पूर्वार्धात आशियाई वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक जिंकणाऱ्या झिल्ली दालाबेहेराने महिलांच्या ४५ किलो वजनी गटात १५१ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. ४९ किलो वजनी गटात स्नेहा सोरेनने १५७ किलो वजन उचलत अग्रस्थान मिळवले. ५५ किलो वजनी गटात राष्ट्रकुल अिजक्यपद स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या सोरोखायबाम बिंदियाराणी देवीने १८१ किलो वजन उचलून अव्वल स्थान मिळवले. मग पुरुषांच्या ६१ किलो वजनी गटात सिद्धांत गोगोईने २६४ किलो वजन उचलत भारताच्या खात्यात चौथ्या सुवर्णपदकाची नोंद केली.

बॅडमिंटन : भारताकडून २ सुवर्णपदकांची निश्चिती

काठमांडू : बॅडमिंटन प्रकारात गुरुवारी भारताने दोन सुवर्णपदके निश्चित केले. पुरुष एकेरीत आर्यमान टंडन आणि सिरिल वर्मा यांनी, तर महिलांमध्ये अश्मिता चालिहा आणि गायत्री गोपिचंद या चारही भारतीय खेळाडूंनीच अंतिम फेरी गाठल्याने भारताच्या पदकतालिकेत एकूण चार पदकांची नोंद होणार आहे.

पुरुष एकेरीच्या पहिल्या उपांत्य सामन्यात आर्यमानने नेपाळच्या दुसऱ्या मानांकित रत्नजित तमंगला २१-१८, १४-२१, २१-१८ असे संघर्षपूर्ण लढतीत पराभूत केले. अन्य सामन्यात अग्रमानांकित सिरिलने श्रीलंकेच्या दिनुका करुणारत्नेला २१-९, २१-१२ अशी धूळ चारली.

महिला गटातील पहिल्या उपांत्य लढतीत अग्रमानांकित अश्मिताने श्रीलंकेच्या अचिनी रत्नासिरीचा २१-५, २१-७ असा फडशा पाडला, तर गायत्रीने श्रीलंकेच्याच दिल्मी दासला २१-१७, २१-१४ असे नमवून अंतिम फेरीतील स्थान पक्के केले. शुक्रवारी अंतिम फेरीचे सामने रंगणार आहेत.

कबड्डी : महिलांचा सलग दुसरा विजय; पुरुषांची दमदार सलामी

काठमांडू : कबड्डीत भारतीय महिलांचा सलग दुसरा, तर पुरुषांची विजयी सुरुवात केली. एपीएफ हॉल येथे चालू असलेल्या या स्पर्धेतील सकाळच्या सत्रात झालेल्या पुरुषांच्या सत्रात भारताने श्रीलंकेला ४९-१६ अशी धूळ चारत साखळीतील पहिल्या विजयाची नोंद केली. मध्यांतराला २५-८ अशी भक्कम आघाडी घेणाऱ्या भारतीयांनी दुसऱ्या सत्रातही त्याच जोशात खेळ करीत हा विजय सोपा केला. महिलांमध्ये भारताने बांगलादेशवर ४७-१६ अशी सहज मात केली.

फुटबॉल : महिला संघाचे श्रीलंकेवर वर्चस्व

काठमांडू : फुटबॉल क्रीडा प्रकारात भारतीय महिला संघाने दुसऱ्या साखळी लढतीत श्रीलंकेचा ६-० असा धुव्वा उडवला. भारतातर्फे संध्या रंगनाथन (१० आणि २५वे मिनिट), रत्नबाला देवी (१८ आणि ८८) यांनी प्रत्येकी दोन, तर देंगमई ग्रेस (७) आणि बाला देवी (९०+१) यांनी प्रत्येकी एक गोल झळकावला. पहिल्या सामन्यात भारताने मालदीवला ५-० अशी धूळ चारली होती.

जलतरण : ११ पदकांची लयलूट

जलतरण प्रकारात भारताने सर्वाधिक ११ पदकांची लयलूट केली. यात चार सुवर्ण, सहा रौप्य आणि एका कांस्यपदकाचा समावेश आहे. पुरुषांच्या २०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात लिकिथ सेल्व्हाराज प्रेमाने सुवर्ण आणि दनुष सुरेशने रौप्यपदक पटकावले. अपेक्षा फर्नाडिसने दुसऱ्या सुवर्णपदकाची नोंद केली.

वुशू : सात सुवर्णपदकांची कमाई

वुशू क्रीडा प्रकारात भारताने सात सुवर्णपदकांची कमाई करीत लक्ष वेधले. सूरज सिंगने वुशूमधील पहिले सुवर्णपदक जिंकले. मग आय. सनथॉय देवी (महिला ५२ किलो), पूनम (महिला ७५ किलो), दीपिका (महिला ७० किलो), सुशिला (महिला ६५ किलो), रोशिबिना देवी (महिला ६० किलो) आणि सुनील सिंग (पुरुष ५२ किलो) यांनीसुद्धा सुवर्णपदके कमावली.