नवी दिल्ली : राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्ताने शनिवारी रंगणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याला तब्बल १४ पुरस्कार विजेते अनुपस्थित राहणार आहेत. खेलरत्न पुरस्कार विजेता रोहित शर्मा तसेच अर्जुन पुरस्कार विजेता इशांत शर्मा इंडियन प्रीमियर लीगसाठी (आयपीएल) संयुक्त अरब अमिरातीत आहेत. तसेच कुस्तीपटू विनेश फोगटसह अन्य तीन जण करोनाग्रस्त आढळले आहेत.

द्रोणाचार्य पुरस्कार विजेते पुरुषोत्तम राय यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साइ) निश्चित केलेल्या नऊ ठिकाणी विजेत्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती भवनातून आभासी पद्धतीने पुरस्कार प्रदान करतील. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसाठी ७४ खेळाडू आणि प्रशिक्षकांची निवड करण्यात आली असून त्यापैकी १४ जण गैरहजर राहतील, असे ‘साइ’ने स्पष्ट केले.

महिला हॉकीपटू राणी रामपाल आणि पॅरा-अ‍ॅथलिट मरियप्पन थांगवेलू बेंगळूरुहून आणि टेबल टेनिसपटू मनिका बात्रा पुण्याहून या सोहळ्यात सामील होतील. ‘देशाबाहेर असणाऱ्यांसाठी कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. त्यांना पुरस्कार नंतर दिले जातील. पुरस्कार विजेत्यांपैकी तिघांना करोनाची बाधा झाल्याने ते या सोहळ्याला उपस्थित राहू शकणार नाहीत,’ असे ‘साइ’कडून सांगण्यात आले. दिल्ली, मुंबई, कोलकाता, चंडीगड, सोनपत, बेंगळूरु, पुणे, हैदराबाद आणि भोपाळ या ठिकाणी येणाऱ्या पुरस्कार विजेत्यांची करोना चाचणी करण्यात येणार आहे.

नीलेश कुलकर्णी यांच्या संस्थेला पुरस्कार

मुंबई : भारताचे माजी क्रिकेटपटू नीलेश कुलकर्णी यांचा शनिवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते खेळ प्रोत्साहन पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. खेळाडूंना योग्य कारकीर्दीच्या दिशेने मार्गदर्शन करण्याचे, विकासाच्या दृष्टीने खेळांना प्रोत्साहन देण्याचे कार्य कुलकर्णी यांच्या इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंटतर्फे (आयआयएसएम) करण्यात येते. गेली १० वर्षे ही संस्था कार्यरत आहे.