इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) १४वे पर्व एकाच शहरात खेळवण्याचे प्रयत्न भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) सुरुवातीला के ले जात होते. मात्र आता चार ते पाच शहरांमध्ये हे पर्व खेळवण्याचा ‘बीसीसीआय’चा विचार आहे. त्यासाठी मुंबईसह चेन्नई, कोलकाता आणि हैदराबाद या शहरांची निवड करण्यात आली आहे.

करोनाची वाढती संख्या लक्षात घेता, ‘बीसीसीआय’ने एकाच शहरात ही स्पर्धा खेळवण्याचे टाळले आहे. सुरुवातीला मुंबईतील वानखेडे स्टेडियम, ब्रेबॉर्न स्टेडियम, डीवाय पाटील स्टेडियम आणि रिलायन्स स्टेडियम या चार ठिकाणी ही स्पर्धा खेळवण्याचे ‘बीसीसीआय’ने ठरवले होते. मात्र महाराष्ट्रातील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

‘‘आयपीएलला सुरुवात होण्यासाठी अद्याप काही आठवडे शिल्लक असले तरी काही निर्णय घ्यावेच लागतील. मुंबईसारख्या एकाच ठिकाणी आयपीएलचे आयोजन करणे धोक्याचे ठरेल. त्यामुळेच आम्ही हैदराबाद, बेंगळूरु आणि कोलकाता या शहरांमध्ये सामने आयोजित करण्याला पसंती दिली आहे. अहमदाबाद येथे प्ले-ऑफ फे री आणि अंतिम लढत खेळवण्यात येईल,’’ असे ‘बीसीसीआय’च्या पदाधिकाऱ्याने सांगितले. ‘आयपीएल’ला एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात सुरुवात होण्याची शक्यता आहे.

‘‘एकाच शहरात सामने आयोजित करण्याचे ठरवले आणि त्या शहरातील करोनाची परिस्थिती आणखीनच बिघडत गेली तर त्याचा संपूर्ण फटका स्पर्धेला बसेल. त्यामुळे एका शहरातील परिस्थिती बिघडली तरी दुसऱ्या शहरात सामन्याचे आयोजन करता येऊ शकते. एका शहरातून दुसऱ्या शहरात जाणे फ्रँचायझींनाही सोपे जाईल,’’ असेही त्यांनी सांगितले.

गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही खेळाडूंना जैव-सुरक्षित वातावरणात राहावे लागणार आहे. ‘‘विविध शहरांत सामने खेळताना खेळाडूंना वेगवेगळ्या जैव-सुरक्षित वातावरणात राहावे लागेल. विविध शहरांतील प्रेक्षकांनी आयपीएलच्या सामन्याचा आनंद लुटावा तसेच खेळाडू आणि या लीगशी संबंधित सर्वाचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यास आमचे प्रथम प्राधान्य राहील,’’ असेही या पदाधिकाऱ्याने सांगितले.