न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठीच्या भारतीय संघाची घोषणा झाली असून, विराट कोहलीच्या नेृत्त्वाखालील संघ येत्या २२ सप्टेंबरपासून न्यूझीलंडच्या आव्हानाला सामोरे जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या(बीसीसीआय) निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर आज दुपारी बारा वाजता झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय संघाची घोषणा करण्यात आली.

संघात कोणतेही मोठे बदल करण्यात आलेले नाहीत. विराट कोहलीकडे संघाचे नेत्तृत्व करणार असून, अजिंक्य रहाणे संघाचा उप-कर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे. रोहीत शर्मा आणि शिखर धवन यांना संघात स्थान मिळाले असून, मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा यांचीही निवड करण्यात आली आहे. रोहीत शर्माचा फॉर्म भारतीय खेळपट्ट्यांवर चांगला असल्याने त्याची निवड करण्यात आली आहे. मधल्या फळीची जबाबदारी अजिंक्य रहाणे, के.एल.राहुल, रविंद्र जडेजा यांच्यावर असणार आहे, तर मोहम्मद शमी, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा, आर.अश्विन, अमित मिश्रा यांच्यावर संघाच्या गोलंदाजीची जबाबदारी असणार आहे. वेस्ट इंडिज दौऱयात संधी मिळालेल्या स्टुअर्ट बिन्नीला मात्र न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी डच्चू देण्यात आला आहे.

वाचा : ‘करवा चौथ’मुळे न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात ‘बीसीसीआय’कडून बदल

गौतम गंभीर याने स्थानिक क्रिकेटमध्ये चांगला धावा केल्या असल्याने न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीसाठी त्याचा विचार केला जाईल अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. गंभीरने दुलीप ट्रॉफीत आतापर्यंत चार अर्धशतकं ठोकली आहेत.  गंभीरने आतापर्यंत ८० च्या सरासरीने ३२० धावा ठोकल्या आहेत. यामध्ये ७७, ५७, ९० आणि ९४ अशा इनिंगचा समावेश आहे. गंभीरच्या या दमदार फॉर्ममुळे न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्याच्या निवडीचा विचार केला जाईल असे सांगण्यात येत होते. पण निवड समितीने वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिका विजयाननंतर संघात कोणतेही मोठे बदल न करण्यावरच भर दिला आहे. गंभीरला संधी देण्यात आलेली नाही.

वाचा: न्यूझीलंडविरुद्धच्या सराव सामन्यासाठी मुंबईच्या संघात रोहितचा समावेश

येत्या २२ सप्टेंबरपासून न्यूझीलंचविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याला सुरूवात होणार असून, तीन सामन्यांच्या या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडच्या संघाची घोषणा याआधीच करण्यात आली आहे. मुख्य कसोटीआधी न्यूझीलंडचा संघ भारतात एक सराव सामना देखील खेळणार आहे. १६ ते १८ सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या सराव सामन्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या १५ सदस्यीय मुंबईच्या संघात रोहित शर्माचा समावेश करण्यात आला आहे.

भारतीय संघ-
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, मुरली विजय, वृद्धमान साहा, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, आर.अश्विन, शिखर धवन, अमित मिश्रा, उमेश यादव