नदाल, चिलिच, ओसाका यांचा तिसऱ्या फेरीत प्रवेश; हॅलेप, क्विटोव्हा यांचे आव्हान संपुष्टात

एएफपी, न्यूयॉर्क

अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत शुक्रवारचा दिवस अमेरिकेच्याच दोन खेळाडूंनी गाजवला. १५ वर्षीय कोको गॉफने तिसरी फेरी गाठणारी सर्वात युवा खेळाडू होण्याचा मान मिळवला, तर जागतिक क्रमवारीत ११६व्या स्थानी असलेल्या टेलर टाऊनसेंडने विम्बल्डन विजेत्या सिमोना हॅलेपला धूळ चारण्याचा पराक्रम केला. याव्यतिरिक्त राफेल नदाल, मरिन चिलिच, नाओमी ओसाका यांनी तिसऱ्या फेरीतील स्थान पक्के केले. तर पेट्रो क्विटोव्हाचे आव्हान संपुष्टात आले.

लुइस आर्मस्ट्राँग स्टेडियमवर २ तास आणि २२ मिनिटे रंगलेल्या महिला एकेरीच्या सामन्यात कोरीने हंगेरीच्या टिमेआ बॅबोसला ६-२, ४-६, ६-४ असे पराभूत केले. वयाच्या १५व्या वर्षी अमेरिकन ग्रँडस्लॅमची तिसरी फेरी गाठणारी ती गेल्या २३ वर्षांतील सर्वाधिक युवा खेळाडू ठरली आहे. १९९६मध्ये अ‍ॅना कोर्निकोव्हा यांनीसुद्धा वयाच्या १५व्या वर्षीच अशी कामगिरी केली होती. कोरीचा पुढील फेरीत गतविजेती आणि जपानची अग्रमानांकित ओसाकाशी सामना होणार आहे. ओसाकाने मॅग्डा लिनेटचा ६-२, ६-४ असा सहज धुव्वा उडवला.

दुसरीकडे बिगरमानांकित टेलरने रोमानियाच्या चौथ्या मानांकित हॅलेपला २-६, ६-३, ७-६ (७-४) असे पिछाडीवरून पराभूत करून खळबळजनक विजयाची नोंद केली. सलग तिसऱ्या वर्षी हॅलेपला उपउपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारण्यात अपयश आले. चेक प्रजासत्ताकच्या सहाव्या मानांकित क्विटोव्हाला जर्मनीच्या आंद्रे पेटकोव्हिचने ६-४, ६-४ असे नेस्तनाबूत केले.

पुरुष एकेरीत स्पेनच्या दुसऱ्या मानांकित नदालला पुढे चाल देण्यात आली. नदालचा ऑस्ट्रेलियन प्रतिस्पर्धी थानसी कोकिनकीसने दुखापतीमुळे या सामन्यातून माघार घेतली. क्रोएशियाच्या २२व्या मानांकित चिलिचने सेड्रिक मार्सलवर ४-६, ६-३, ७-५, ६-३ असा विजय मिळवला. रशियाच्या पाचव्या मानांकित डॅनिल मेद्वेदेवने ह्य़ुगो डेलिनचा ६-३, ७-५, ५-७, ६-३ असा पराभव करून पुढील फेरी गाठली.

हॅलेपविरुद्ध सामना खेळताना तुम्हाला क्षुल्लक चूकही महागात पडू शकते. परंतु दुसऱ्या सेटमध्ये मला तिच्या कमकुवत बाजूंचा अधिक स्पष्टपमे अंदाज आला आणि त्यानुसार मी माझ्या खेळत बदल केला. कारकीर्दीत पहिल्यांदाच तिसरी फेरी गाठल्याने मी आनंदी असून यापुढील सामन्यांतही कामगिरीत सातत्य राखेन.

– टेलर टाऊनसेंड

प्रत्येक सामन्यात चाहत्यांना माझ्या कामगिरीचे आकर्षण असते. मात्र मी फक्त माझ्या खेळाकडेच लक्ष देते. ओसाकाविरुद्ध खेळण्यासाठी मी उत्सुक आहे. परंतु यादरम्यान माझा दुहेरीतीलसुद्धा सामना असल्याने मला तंदुरुस्तीवर लक्ष द्यावे लागणार आहे.

– कोरी गॉफ