ऑस्ट्रेलियात पार पडलेल्या टी-२० विश्वचषकात भारतीय महिला संघाचं प्रतिनिधीत्व केलेल्या १६ वर्षीय रिचा घोषने करोनाविरुद्ध लढ्यात आपला सहभाग नोंदवला आहे. रिचाने पश्चिम बंगाल मुख्यमंत्री सहायता निधीला करोनाविरुद्ध लढ्यासाठी एक लाखाची मदत केली आहे. रिचाच्या वडिलांनी स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे एक लाखाचा धनादेश सुपूर्द केला आहे. सध्या संपूर्ण देश करोनाविरोधात लढतो आहे. मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी सहायता निधीला मदत करण्याची विनंती केली होती. या देशाची नागरिक म्हणून या लढ्यात सहभागी होणं हे माझं काम आहे. याच भावनेने मी मदत केल्याचं रिचा घोषने सांगितलं.

महिला टी-२० विश्वचषकात रिचाला अवघ्या दोन सामन्यांत खेळण्याची संधी मिळाली. मात्र याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिरंगी मालिकेत रिचाने भारतीय संघाकडून पदार्पण केलं होतं. पश्चिम बंगालमधील स्थानिक क्लब आणि संघटनांनीही यावेळी मुख्यमंत्री सहायता निधीला आपली मदत जाहीर केली आहे.

दर दिवशी देशातील प्रत्येक महत्वाच्या शहरात करोनाचे रुग्ण सापडत आहे. पंतप्रधान मोदी यांनी रविवारी मन की बात या आपल्या कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधत, या दिवसांत झालेल्या त्रासाबद्दल माफी मागितली. मात्र सर्वांच्या भल्यासाठी हा निर्णय घेतल्याचं मोदींनी स्पष्ट केलं. यावेळी मोदींनी सर्व डॉक्टर आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांचे आभार मानले.