संगीताची मेजवानी, फटाक्यांची आतषबाजी आणि रंगांची उधळण आणि सोबतीला ‘गंगनम स्टाईल’ गायक पार्क जे संग (साय) याची अदाकारी यामुळे १७व्या इन्चॉन आशियाई स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला ‘चार चाँद’ लागले. नृत्याच्या गंगनम शैलीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रियता मिळवणाऱ्या सायने दक्षिण कोरियातील नव्या कोऱ्या स्टेडियमवरील उपस्थितांना ठेका धरण्यास भाग पाडले. आता पुढील १५ दिवस जवळपास १३ हजार अ‍ॅथलिट्समध्ये पदकांसाठी झुंज रंगणार आहे.
दक्षिण कोरियाचे अध्यक्ष पार्क ग्युएन-हाय यांच्यासह ४५ देशांच्या चमूने संचलनात भाग घेतला. ध्वजवाहक सरदारा सिंगच्या नेतृत्वाखाली भारताच्या चमूनेही हातात तिरंगा घेऊन ध्वजसंचलन केले. काळ्या रंगाचा ब्लेझर परिधान केलेले पुरुष आणि निळ्या रंगाची साडी नेसलेल्या महिला खेळाडू स्टेडियमवर अवतरल्यानंतर भारतीय चाहत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले. भारताचा जवळपास ७०० जणांचा चमू या स्पर्धेत सहभागी होणार आहे. पार्क ग्युएन-हाय यांनी स्पर्धेला सुरुवात झाल्याचे घोषित केले. कोरियन अभिनेत्री ली यंग-ए ही क्रीडाज्योत प्रज्वलित करणार असल्यामुळे उद्घाटन सोहळ्याच्या तिकीटविक्रीला चांगला प्रतिसाद मिळाला होता. पण तरीही ६१ हजार प्रेक्षकक्षमतेच्या या स्टेडियममधील अनेक जागा रिकाम्या दिसत होत्या.
पंगमुल प्ले ही कोरियन संस्कृतीची परंपरा तसेच के-पॉप बॉय यांच्या ग्रूपने अफलातून अदाकारी पेश करत सोहळ्यात रंग भरले. उद्घाटन सोहळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात ‘न्यू एशिया, अ साँग ऑफ होप’ आणि ‘इन्चॉन, अ प्लेस फॉर वन एशिया’ ही दोन गाणी सादर करण्यात आली. सांस्कृतिक कार्यक्रम आटोपल्यानंतर यजमान दक्षिण कोरियाचा ध्वज स्टेडियमच्या केंद्रस्थानी आणण्यात आला. त्यानंतर आशियाई ऑलिम्पिक परिषदेचे अध्यक्ष शेख फहाद अल-साबा यांनी सहभागी खेळाडूंचे स्वागत केले. या वेळी प्रत्येक संघात १३० खेळाडूंचा समावेश असावा, अशी अट ठेवण्यात आली होती. पण भारतीय खेळाडूंच्या लढती शनिवारी किंवा रविवारी असल्यामुळे भारतीय चमूत कमी खेळाडू दिसत होते.