१८ मार्च हा दिवस भारतीय क्रिकेटसाठी महत्त्वाच्या दिवसांपैकी एक आहे. याच दिवशी २०१२ साली भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. पाकिस्तान विरूद्ध ढाक्यात आशिया कप स्पर्धेअंतर्गत हा सामना खेळण्यात आला होता. हा सामना सचिनचा शेवटचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना होता, पण त्या सामन्यात विराट स्टार खेळाडू ठरला होता. सचिनने या सामन्यात दमदार अर्धशतक ठोकले होते. त्याने ४८ चेंडूत ५२ धावा केल्या होत्या. पण विराटने सामन्यात तुफानी १८३ धावा केल्या होत्या. ही त्याची एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम धावसंख्या आहे. त्याच्या खेळीच्या जोरावर भारताने पाकला ६ गडी राखून पराभूत केले होते.

असा रंगला होता रोमांचक सामना

सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार मिस्बाह उल हक याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. सलामीवीर मोहम्मद हाफीज आणि नासीर जमशेद यांनी कर्णधाराचा हा निर्णय योग्य ठरवत चांगली खेळी होती. हाफीजने ११३ चेंडूत ९ चौकार आणि १ षटकार लगावत १०४ धावा केल्या होत्या, तर नासीर जमशेदने १०४ चेंडूत १० चौकार आणि १ षटकार लगावत ११२ धावा केल्या होत्या. यूनिस खानने अंतिम षटकांमध्ये ३४ चेंडूत ५२ धावा करत पाकिस्तानला ३२९ धावांपर्यंत मजल मारून दिली होती. प्रवीण कुमार आणि अशोक डिंडाला २-२ बळी मिळाले होते.

अवाढव्य आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा सलामीवीर गौतम गंभीर शून्यावर बाद झाला होता. त्यानंतर सचिनला विराटची साथ लाभली. सचिन ५२ धावा करून माघारी परतला. त्याने ५ चौकार आणि १ षटकार लगावला. विराटने मात्र पाक गोलंदाजांना चोप दिला. त्याने १४८ चेंडूत २२ चौकार आणि १ षटकार लगावत १८३ धावा कुटल्या. या सामन्यात रोहिन शर्मानेही ६८ धावा केल्या होत्या. या साऱ्यांच्या खेळीच्या जोरावर भारताने ६ गडी आणि १३ चेंडू राखून सामना जिंकला होता.