‘साई’ (Sports Authority of India) च्या कोलकाता येथील सरावकेंद्रात सरावादरम्यान एका बॅडमिंटनपटूचा सरावादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. निहेंद्रू मलिक असं या १८ वर्षीय खेळाडूचं नाव असून तो कोलकात्याजवळील मध्यमग्राम शहरात राहत होता.

निहेंद्रूने ‘साई’च्या, ‘या आणि खेळा’ (Come and Play) या शिबीरात सहभाग घेतला होता. एप्रिल महिन्यापासून तो कोलकात्यात सराव करत होता. आजही आपल्या साथीदारासह कोर्टमध्ये सराव करत असताना निहेंद्रू अचानक खाली पडला. यानंतर स्थानिक प्रशिक्षक माही मोहन समांत्रा आणि इतर खेळाडूंनी निहेंद्रूला रुग्णालयात दाखल केलं. मात्र तोपर्यंत तोपर्यंत निहेंद्रूने अखेरचा श्वास घेतला होता.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार निहेंद्रू उपाशीपोटी सराव करत होता. आठवड्याचा शेवटचा दिवस असल्याने केंद्रात मेडीकल टीमही हजर नव्हती. त्यात खेळाडूंसाठीही सराव हा ऐच्छिक ठेवण्यात आला होता. या प्रकारानंतर निहेंद्रूला स्थानिक रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र तोपर्यंत वेळ हातातून निघून गेली होती. हृदयविकाराचा झटका आणि ब्रेन हॅमरेज या दोन कारणांमुळे निहेंद्रूचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलंय.

निहेंद्रूचे वडील नित्यानंद मलिक हे भारतीय रेल्वेचे निवृत्त अधिकारी आहेत. या घटनेनंतर स्थानिक लोकांनी ‘साई’च्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा दबाव टाकूनही नित्यानंद मलिक यांनी नकार दर्शवला आहे. “या घटनेसाठी मला कोणालाही जबाबदार धरायचं नाहीये. ‘साई’चा या घटनेत काहीही दोष नाहीये. निहेंद्रू एक वर्षभरापासून बॅडमिंटनचा सराव करत होता. मात्र त्यावेळी त्याला कधीही अशाप्रकारचा त्रास झाला नव्हता.” नित्यानंद मलिक यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीत आपली बाजू मांडली.

घडलेल्या प्रकारानंतर साईने घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. जर या प्रकारात साईच्या कोणताही अधिकारी दोषी आढळला तर त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. ‘साई’चे स्थानिक संचालक मनमीत सिंह यांनी पत्रकारांना माहिती दिली. या घटनेमुळे परिसरात सध्या तणावाचं वातावरण आहे.