मुंबईतील कृशीव टेकचंदानी या १९ वर्षीय गोल्फपटूने आतापर्यंत जिंकलेल्या विविध स्पर्धातील बक्षीस रक्कम दान केली असून त्यातून चेंबूर स्थित प्रेसिडेन्सी गोल्फ क्लब मधील सर्व कर्मचारी वर्ग आणि आसपासच्या परिसरातील सर्वसामान्य नागरिकांचे करोना लसीकरण करण्याचे निश्चित केले आहे. या कार्याच्या माध्यमातून एकूण ३५० ब्लू कॉलर कर्मचारी तसेच क्लबच्या परिसरातील ९५० सर्वसामान्य नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

“गोल्फ क्लब वर गवत कापणारे, सामान उचलणारे, अन्य कर्मचारी हे सतत कार्यरत असतात. मी आज जे काही यश मिळवले आहे त्यात या सर्वांचा मोठा वाटा आहे. सध्या मी फक्त १९ वर्षाचा आहे. पुढे भरपूर करियर आहे. पण सध्याच्या कोविड काळात माझ्या या सहकाऱ्यांचे आयुष्य सुरक्षित करणे गरजेचे आहे. त्यामुळेच मी हा निर्णय घेतला”, अशी भावना कृशीव ह्याने ह्यावेळी बोलताना व्यक्त केली.

इतर ठिकाणी असे अनेक कर्मचारी असून त्यांना मदत करण्यासाठी अन्य लोकांनी देखील पुढे येण्याची गरज आहे. करोनाला हरविण्यासाठी सर्वांचे लसीकरण करणे आवश्यक असल्याची अपेक्षा कृशीव ह्याने व्यक्त केली.

दुबई स्थित बच हार्मोन गोल्फ स्कूलमध्ये २०२१ साली प्रशिक्षण घेतलेल्या कृशीवने त्यानंतर फ्लोरिडा येथील बिशप गेट गोल्ड अकादमीमध्ये गोल्फचे प्रशिक्षण घेतले. भारताबरोबरच अबू धाबी, यूएई, सिंगापूर, स्कॉटलंड इंग्लंड अमेरिक अशा विविध देशातील गोल्फ स्पर्धेत कृशीवने यश मिळवले आहे.