आर्थिक वादामुळे वेस्ट इंडिजचा संघ दौरा अर्धवट सोडून तडकाफडकी माघारी परतल्यामुळे भारताच्या विश्वचषकाच्या तयारीला धक्का बसला; परंतु भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्वरेने हालचाली करून श्रीलंकेला एकदिवसीय मालिकेसाठी राजी करून भारताच्या तयारीसाठी पोषक वातावरण तयार केले आहे. मंडळाचा आदेश शिरसावंद्य मानून भारतात आलेल्या श्रीलंकेच्या संघाला विश्वविजेत्या संघाशी दोन हात करण्यासाठी पुरेशा तयारीची संधीसुद्धा मिळालेली नाही. मागील विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील हे आशियातील दोन दिग्गज संघ कटकमध्ये रविवारी पहिल्या एकदिवसीय सामन्याच्या निमित्ताने आमनेसामने असणार आहेत.
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील वातावरण आणि भारतीय उपखंडातील वातावरण यात खूप फरक आहे. परंतु तरीही भारतीय संघाला प्रभारी संघनायक विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आपली दुसरी फळी अजमावता येऊ शकते. नियमित कर्णधार महेंद्रसिंग धोनीला पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली आहे.
*कोहलीची दुहेरी परीक्षा
या मालिकेत कोहली स्वत:ला सिद्ध करण्याचा नव्याने प्रयत्न करणार आहे. इंग्लंड दौऱ्यावर धावांसाठी झगडणाऱ्या कोहलीला भारतात परतल्यावर वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत सूर गवसला आहे. सुनील गावस्कर यांच्या सल्ल्यानुसार चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरून त्याने ६२ धावा केल्या, त्यानंतर पुन्हा आपल्या तिसऱ्या स्थानावर फलंदाजी करताना १२७ धावांची खेळी साकारली होती.
कोहलीकडे भावी कर्णधार म्हणून पाहिले जाते. टीकाकारांना चोख उत्तर देत नेतृत्व आणि फलंदाजी या दोन्ही आघाडय़ांवर कोहलीला लढावे लागणार आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने १२ एकदिवसीय सामन्यांपैकी नऊ सामने जिंकले आहेत. कोहलीची फलंदाजीची सरासरी ५१.५७ जरी असली तरी या १२ सामन्यांची सरासरी तीन शतकांसह ६५.१२ इतकी आहे. त्यामुळे अधिक जबाबदारी तो हिमतीने पेलवू शकतो, हेच यातून स्पष्ट होते आहे. ५ नोव्हेंबरला वयाची २६ वष्रे पूर्ण करणाऱ्या कोहलीला सहा हजार धावांचा टप्पा गाठणारा सर्वात वेगवान फलंदाज बनण्यासाठी आणखी १२१ धावांची आवश्यकता आहे.
*सलामीसाठी रहाणेची दावेदारी
रोहित शर्मा आणि शिखर धवन या सलामीवीरांच्या शर्यतीत अजिंक्य रहाणेसुद्धा आपल्या गुणवत्तेनिशी सामील झाला आहे. आता शर्माऐवजी सलामीवीराची भूमिका बजावणाऱ्या रहाणेसाठी आपला दावा सक्षम करण्यासाठी तीन संधी असणार आहेत. विंडीजविरुद्ध धवनने एक अर्धशतक नोंदवले होते; परंतु धवनच्या फलंदाजीत सातत्याचा अभाव दिसून येत आहे.
रैना आपली अष्टपैलू चुणूक दाखवण्यात वाकबगार आहे. तसेच बंगालचा यष्टीरक्षक-फलंदाज वृद्धिमान साहासाठी ही चांगली संधी असेल. अंबाती रायुडू हा आणखी एक फलंदाज स्थान टिकवण्यासाठी झगडत आहे.
*भुवनेश्वर-शमीची भारताला उणीव
भारताचा गोलंदाजीचा मारा मात्र फलंदाजीच्या फळीच्या तुलनेत थोडा कमजोर वाटत आहे. नियमित वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी यांच्या अनुपस्थितीत उमेश यादव, वरुण आरोन आणि इशांत शर्मा यांच्यावर भारताची मदार असेल. याशिवाय संघात परतलेल्या आर. अश्विनसह लेग-स्पिनर अमित मिश्रा आणि डावुखरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेल यांच्यावर फिरकीची धुरा असेल.
*श्रीलंकेकडे गोलंदाजीचा मारा दुबळा
गेल्या महिन्यात विंडीजच्या संघाने आर्थिक वाद विकोपाला गेल्यामुळे माघारी परतण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतात आलेल्या श्रीलंकेची गोलंदाजीची फळी महत्त्वाच्या खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे दुबळी झाली आहे. लसिथ मलिंगा आणि सुरंगा लकमल या वेगवान गोलंदाजांसह अजंथा मेंडिस आणि रंगना हेराथ हे फिरकी गोलंदाज या संघात नाहीत. त्यामुळे ऑफ-स्पिनर सूरज रणदीवच्या कामगिरीकडे सर्वाचे लक्ष असेल.
ब्रेबॉर्न स्टेडियमवर गुरुवारी झालेल्या सराव सामन्यात मनोज तिवारीच्या नेतृत्वाखालील भारतीय ‘अ’ संघाने श्रीलंकेच्या गोलंदाजांची पिटाई करीत ५० षटकांत ३८२ धावांचा डोंगर उभारला होता. रोहित शर्मा (१४२) आणि मनीष पांडे (नाबाद १३५) यांच्या शतकांमुळे भारत ‘अ’ संघाने ८८ धावांनी विजय मिळवला होता.
संघ – भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, अंबाती रायुडू, वृद्धिमान साहा, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, धवल कुलकर्णी, उमेश यादव, इशांत शर्मा, अमित मिश्रा, मुरली विजय, वरुण आरोन, अक्षर पटेल.
श्रीलंका : अँजेलो मॅथ्यूज (कर्णधार), कुसल परेरा, तिलकरत्ने दिलशान, उपुल थरंगा, कुमार संगकारा, महेला जयवर्धने, अशन प्रियंजन, निरोशान डिकवेला, थिसारा परेरा, न्यूवान कुलसेकरा, धम्मिका प्रसाद, लाहिरू गमगे, चतुरंगा डी’सिल्व्हा, सीक्युगे प्रसन्ना, सूरज रणदीव.
सामन्याची वेळ : दु. १.३० वा.पासून.
बाराबतीची खेळपट्टी आता पूर्वीसारखी संथ राहिलेली नाही. रविवारी येथे धावांचा पाऊस पडेल. २८० ते ३०० पर्यंत धावसंख्या रचणे मुळीच कठीण नाही; परंतु सायंकाळी दव पडत असल्यामुळे त्यानुसार डावपेच आखणे महत्त्वाचे ठरेल.
– क्यूरेटर पंकज पटनायक