दोन वर्षांपूर्वी भारताला सुरेश रैनाच्या नेतृत्वाखाली झिम्बाब्वेला एकदाही पराभूत करायला जमले नव्हते. त्याच पराभवाचा वचपा काढण्यासाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सज्ज झाला आहे. भारतीय संघ सध्या यशाच्या शिखरावर असला तरी महेंद्रसिंग धोनी संघात नसल्याने विराटचीही खरी परीक्षा असेल. धोनीबरोबरच काही खेळाडूही या संघात नसल्याने युवा खेळाडूंसाठी ही चांगली संधी असून ते या संधीचे सोने करतात का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेमधील पहिला सामना बुधवारी होत असून दौऱ्याची विजयी सुरुवात करण्यासाठी भारतीय संघ सज्ज असेल.
झिम्बाब्वेच्या दोन वर्षांपूर्वीच्या दौऱ्यात भारतीय संघ सुरेश रैनाच्या नेतृत्वाखाली तिरंगी मालिका खेळण्यासाठी आला होता. त्या दौऱ्यात भारताला एकदाही झिम्बाब्वेला पराभूत करता आले नव्हते, तसेच श्रीलंकेकडूनही पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.
भारतीय संघात धोनी, आर. अश्विन, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार यांना विश्रांती दिली आहे. या खेळाडूंची उणीव नक्कीच संघाला जाणवेल, पण भारतीय संघातील युवा खेळाडूंसाठी ही एक नामी संधी असेल. शिखर धवन आणि रोहित शर्मा हे दोघेही सलामीवीर चांगल्या फॉर्मात आहेत, पण भारताच्या मधल्या फळीला मात्र अजूनही चांगली कामगिरी करता आलेली नाही. गेल्या काही स्पर्धामध्ये सुरेश रैनाला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही, त्यामुळे त्याच्यासाठी हा दौरा निर्णायक ठरू शकतो. चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि अंबाती रायुडू या युवा खेळाडूंना संघात स्थान निश्चित करण्यासाठी ही सुवर्णसंधी असेल. अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या कामगिरीवर साऱ्यांचेच लक्ष असेल. गोलंदाजीमध्ये फिरकीपटू अमित मिश्राला बऱ्याच कालावधीनंतर संधी मिळत आहे, तर शामी अहमद, जयदेव उनाडकट, मोहित शर्मा आणि परवेझ रसूल यांना या मालिकेत गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी असेल.
झिम्बाब्वेचा संघ बरेच दिवस सामने खेळलेला नाही, त्याचबरोबर त्यांच्या संघातील खेळाडू नावाजलेले नसल्याने त्यांच्याबद्दल कोणताच अंदाज व्यक्त करता येत नाही. संघातील ४-५ नावे सोडल्यास अन्य खेळाडूंचा खेळ जास्त कोणी पाहिला नसल्याने भारतीय संघाला जपून पावले टाकावी लागतील.
प्रतिस्पर्धी संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, दिनेश कार्तिक, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, सुरेश रैना, अमित मिश्रा, परवेझ रसूल, शामी अहमद, आर. विनय कुमार, जयदेव उनाडकट आणि मोहित शर्मा.
झिम्बाब्वे : ब्रेन्डन टेलर (कर्णधार/ यष्टिरक्षक), सिकंदर रझा, तेंडइ चतरा, मायकेल चिनोऊया, एल्टन चिगंबुरा, गॅ्रमी क्रीमर, कायले जार्विस, टिमिसेन मरुमा, हॅमिल्टन मसाकाझा, नास्ताइ एम’शँगवे, तिनोतेंडा मुतोस्बोडझी, वुसिमुझी सिबांडा, प्रोस्पर उत्सेया, ब्रायन व्हिटोरी, माल्कम वॉलर आणि सीन विल्यम्स.
थेट प्रक्षेपण : टेन क्रिकेट, टेन एचडी.
वेळ : दुपारी १२.३० वा.पासून.