सलग तिसऱ्या सामन्यात डावाने पराभव टाळण्यासाठी वेस्ट इंडिजच्या संघाची धडपड सुरू आहे. गुरुवारी न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर विंडीजची २ बाद १६८ अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे डावाने पराभवाची नामुष्की टाळण्यासाठी वेस्ट इंडिजला अजून २२८ धावांची आवश्यकता आहे. न्यूझीलंडने ९ बाद ६०९ धावसंख्येवर आपला डाव घोषित केल्यावर वेस्ट इंडिजचा पहिला डाव फक्त २१३ धावांवर आटोपला. टिम साऊदी आणि ट्रेंट बोल्ट या वेगवान गोलंदाजांपुढे विंडीजच्या फलंदाजांनी हाराकिरी पत्करली. त्यामुळे न्यूझीलंडने विंडीजला फॉलोऑन दिला. त्यानंतर दुसऱ्या डावातही वेस्ट इंडजची १ बाद १८ अशी अवस्था झाली होती. परंतु किर्क एडवर्ड्स आणि डॅरेन ब्राव्हो यांनी दुसऱ्या विकेटसाठी ११७ धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला. लेग स्पिनर इश सोधीने एडवर्ड्सला (५९) तंबूची वाट दाखवली. खेळ थांबला तेव्हा ब्राव्हो आणि मार्लन सॅम्युअल्स अनुक्रमे ७२ आणि १७ धावांवर खेळत होते.