गौरव जोशी

सकाळी आठ वाजल्यापासूनच ओव्हलचे रेल्वे स्थानक चाहत्यांनी भरून गेले होते. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील विश्वचषकाचा सामना पाहण्यासाठी साहजिकच प्रत्येक जण उत्सुक होते. ओव्हलचे रेल्वे स्थानक त्या मानाने फार लहान असले तरी जवळपास २० हजार चाहत्यांची स्थानकाबाहेर गर्दी जमली होती. सरकता जिन्यावरून स्थानकाच्या बाहेर पडत असताना कानावर फक्त ‘जितेगा भाई जितेगा, इंडिया जितेगा’चाच आवाज घुमत होता.

स्टेडियमकडे येताना दूरवरूनच तिरंगी आणि भगव्या रंगाचे झेंडे दिसत होते. चाहत्यांव्यतिरिक्त प्रसारमाध्यमे, संघाचे टी-शर्ट, हॅण्डबॅण्ड यांसारख्या गोष्टी विकणारे स्टॉल्स यांचीही संख्या भरपूर होती. त्यामुळे हा विश्वचषक खऱ्या अर्थाने सुरू झाला आहे, असे वाटत होते. दोन आठवडय़ांपूर्वी झालेल्या सराव सामन्यांना येथे फारशी गर्दी नव्हती. मात्र आज सकाळपासूनच रेल्वे स्थानकापासून ते स्टेडियमपर्यंत तिकीट आहेत का, याचीच विचारपूस काही चाहते करत होते. मात्र जवळपास चार ते सहा महिन्यांपूर्वीच सर्व तिकिटे विकली गेल्यामुळे काही चाहत्यांना निराशसुद्धा व्हावे लागले, तर काही दुप्पट-तिप्पट किंमत देऊन तिकीट घेण्यास तयार होते.

स्टेडियमच्या आत प्रवेश करताच एक वेगळे वातावरण पाहायला मिळाले. ओव्हल स्टेडियमला दोन्ही बाजूने स्टॅण्ड नसल्यामुळे आजूबाजूच्या इमारतींमधील दुसऱ्या, तिसऱ्या मजल्यावरून चाहते सहज सामन्याचा आनंद लुटू शकत होते. त्या मजल्यांवरसुद्धा भारताचेच झेंडे मोठय़ा प्रमाणात दिसत होते, तर फक्त एका कोपऱ्यातील खिडकीत एक ऑस्ट्रेलियन झेंडा दिसला. स्टेडियमवरील २० हजार चाहत्यांपैकी जवळपास १९,५०० चाहते हे भारतालाच पाठिंबा दर्शवत होते

नाणेफेक जिंकून कर्णधार विराट कोहलीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेताच संपूर्ण स्टेडियमने एकच कल्लोळ केला. सामना सुरू झाल्यानंतर दोन तासांनी एका प्रवेशद्वाराकडे फटीतून सामना पाहण्यासाठीसुद्धा चाहत्यांची धडपड सुरू होती. त्यामुळे मुंबईतील वानखेडे स्टेडियमची आठवण झाली.

भारत-ऑस्ट्रेलिया सामना पाहण्यासाठी क्यूबा येथून एक चाहता आला होता, तर दोघे जण चक्क हवाई या देशातून आले होते. भारताचे चाहते संपूर्ण विश्वभर पसरले आहेत, हे याचे उत्तम उदाहरण होते. मुख्य म्हणजे हर्षां भोगले, वीरेंद्र सेहवाग आणि सुनील गावस्कर हे समालोचक सीमारेषेजवळ दिसल्यावरही चाहते त्यांच्या नावाचा जयघोष करत होते. सामन्यादरम्यान चाहत्यांच्या आवाजामुळे प्रत्यक्षात मैदानावर काय सुरू आहे, याकडेही बहुतांश वेळा दुर्लक्ष झाले. त्यातही विदेशी चाहते हे बघून गप्प झाले होते. परंतु हा आवाज थांबवणे शक्य नव्हते. कारण शिखर धवन, विराट कोहली आणि हार्दिक पंडय़ा यांच्या फटकेबाजीमुळे चाहते ढोल-ताशांच्या तालावर बेभान होऊन नाचत होते. त्यामुळे इंग्लंडच्या ओव्हलवर सामना सुरू आहे की भारतातील ईडन गार्डन्सला, हा प्रश्न पडला होता.