तब्बल १२ वर्षांनंतर रशियाचा संघ फिफा विश्वचषकाच्या मुख्य फेरीसाठी पात्र ठरला आहे. गुणवत्ता असूनही काहीसा मागे पडलेला रशियन संघ या वेळी क्रांती कारक कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला आहे. प्रशिक्षक गस हिडिंक यांनी रशियाला २००८च्या युरो चषकाच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारून दिली होती. सहा वर्षांपूर्वी प्रशिक्षकपदाचा ताबा घेत हिडिंक यांनी दोन आठवडय़ांच्या सराव शिबिरात खेळाडूंच्या तंदुरुस्तीचा स्तर उंचावला होता. त्याचीच फलनिष्पत्ती त्यांना युरो चषकात मिळाली. आता तेवढय़ाच ताकदीचे परदेशी प्रशिक्षक लाभल्यामुळे फॅबियो कॅपेलो यांच्याकडून रशियावासीयांना भरपूर आशा आहेत.
कायम आशावादी आणि प्रतिस्पध्र्याना गारद करण्याची वृत्ती, ही कपेलो यांची ओळख. दुय्यम दर्जाच्या रशियन लीगमध्ये खेळणाऱ्या रशियाच्या खेळाडूंना त्यांनी युरोपीयन लीगमध्ये खेळण्याची संधी दिली. मात्र उष्ण वातावरणात खेळताना रशियाचे खेळाडू निष्प्रभ ठरले. या वेळी विश्वचषकासाठी कपेलो यांनी सर्वोत्तम संघ तयार केला आहे. इटलीचे मधल्या फळीतील खेळाडू, एसी मिलान आणि ज्युवेंट्स या क्लबचे प्रतिनिधित्व करणारे तसेच प्रशिक्षकपदाचा गाढा अनुभव असलेल्या कॅपेलो यांना संघाला यशोशिखरावर कसे न्यायचे, याचे कसब पक्के ठाऊक आहे.
२००२मध्ये रशियाला विश्वचषकाच्या बाद फेरीत मजल मारण्यासाठी शेवटच्या सामन्यात बरोबरीची आवश्यकता होती. पण बेल्जियमकडून ३-२ असे पराभूत व्हावे लागल्यामुळे त्यांना आगेकूच करण्यासाठी दोन गुण कमी पडले. त्यानंतर रशियाचा संघ गेल्या दोन विश्वचषक स्पर्धासाठी पात्र होऊ शकला नाही. २००६मध्ये ते पात्रता फेरीत तिसऱ्या स्थानावर फेकले गेले. २०१०मध्ये त्यांना प्ले-ऑफ फेरीत हार पत्करावी लागली. मात्र या वेळी त्यांनी कोणतीही कसर न ठेवता पोर्तुगालपेक्षा एक गुण जास्त मिळवत गटात अव्वल स्थान पटकावले. कपेलो यांची जिंकण्याची टक्केवारी ५८ टक्के इतकी ठरली. आता रशियाचा संघ ब्राझीलमधील महासोहळ्यात कितपत मजल मारतो, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

अपेक्षित कामगिरी
पात्रता फेरीत पोर्तुगालपेक्षा चांगली कामगिरी केल्यामुळे रशिया संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. पण तब्बल १२ वर्षांनंतर फिफा विश्वचषकात खेळताना त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. ‘ह’ गटात बेल्जियम, अल्जेरिया आणि दक्षिण कोरिया हे संघ असल्यामुळे रशियासाठी फारशी अवघड परिस्थिती नाही. बेल्जियम संघ या गटात अव्वल स्थान पटकावण्याची चिन्हे दिसत आहेत. मात्र क्रमवारीचा विचार केल्यास रशिया आणि दक्षिण कोरिया यांच्यात दुसऱ्या क्रमांकासाठी चुरस होऊ शकते. त्यातही दक्षिण कोरियापेक्षा रशियाचे पारडे अधिक जड आहे. रशिया संघ दुसऱ्या फेरीत मजल मारणार, असा अंदाज फुटबॉल पंडितांनी व्यक्त केला आहे. पण दुसऱ्या फेरीत त्यांनी युरो २०१२ प्रमाणे सरस कामगिरी केली, तरच रशियाचे आव्हान जिवंत राहू शकते. पण सद्य परिस्थितीचा विचार केल्यास, रशियाची घोडदौड दुसऱ्या फेरीतच संपुष्टात येणार आहे.

बलस्थाने आणि कच्चे दुवे
सध्याच्या घडीला अनुभव हीच रशियाची खरी ताकद मानली जात आहे. रशिया संघात फक्त हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच अव्वल खेळाडू आहेत. मात्र प्रशिक्षक फॅबियो कॅपेलो ही त्यांची भक्कम बाजू आहे. प्रतिस्पध्र्याचे आव्हान संपुष्टात आणणे, हीच कपेलो यांची रणनीती असते. मात्र रशिया संघातील बरेचसे खेळाडू हे हाडे गोठवणाऱ्या थंडीत रशियन लीगसारख्या स्पर्धामध्ये खेळत असतात. तर ब्राझीलमधील वातावरण अतिउष्ण असणार आहे. त्यामुळे वातावरणाशी जुळवून घेण्याचे सर्वात मोठे आव्हान रशियासमोर असणार आहे. ऊर्जेचा अभाव आणि तंदुरुस्तीची समस्या याची चिंता रशियाला सतावत आहे.
फिफा क्रमवारीतील स्थान : १८
विश्वचषकातील कामगिरी
सहभाग : ३ वेळा (२०१४सह)
संभाव्य संघ
 गोलरक्षक : इगोर अकिनफिव्ह, युरी लॉडीगिन, सर्जी रायझिकोव्ह. बचावफळी : अलेक्झांडर अन्यूकोव्ह, अ‍ॅलेक्सी बेरेझुस्की, व्ॉसिली बेरेझुस्की, सर्जी इग्नाशेव्हिच, जॉर्जी शेनीकोव्ह, व्लादिमिर ग्रॅनाट, अ‍ॅलेक्सी कोझलोव्ह, आंद्रेई येशचेंको, दिमित्री कोम्बारोव्ह, आंद्रेई सेमानोव्ह. मधली फळी : इगोर डेनिसोव्ह, युरी झिरकोव्ह, अ‍ॅलन झागोएव्ह, युरी गाझिन्स्की, रोमन शिरोकोव्ह, डेनिस ग्लुशाकोव्ह, पॅवेल मोगिलेव्हेट्स, विक्टर फैझुलीन, ओलेग शाटोव्ह. आघाडीवीर : व्लादिमिर बायस्ट्रोव्ह, अ‍ॅलेक्झांडर केर्झाकोव्ह, आर्यटम झ्युबा, अ‍ॅलेक्सी आयनोव्ह, अ‍ॅलेक्झांडर कोकोरिन, मॅक्सिम कान्नूनिकोव्ह, पॅवेल पोग्रेबायक, अ‍ॅलेक्झांडर सॅमेडोव्ह.
स्टार खेळाडू : इगोर अकिनफिव्ह, अ‍ॅलन झागोएव्ह, अ‍ॅलेक्झांडर कोकोरिन, इगोर डेनिसोव्ह.
व्यूहरचना : ४-२-३-१
मुख्य प्रशिक्षक : फॅबियो कॅपेलो