भारताच्या गुरप्रीत सिंग व जितू राय यांनी पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूलमध्ये अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक मिळवत आशियाई एअरगन नेमबाजी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. भारताने या क्रीडाप्रकारात सांघिक विजेतेपद पटकावले.
इराणच्या सेपेहर सफारीने सुवर्णपदक मिळवत आश्चर्याचा धक्का दिला. पात्रता फेरीत तो सातव्या क्रमांकावर होता. त्याने ही झेप घेताना जागतिक क्रमवारीतील पाचवा मानांकित खेळाडू व्लादिमीर इसाचेन्कोलाही पराभवाचा धक्का दिला. त्याने १९८.७ गुण मिळविले.
भारताच्या गुरप्रीतने १९७.६ गुणांसह रुपेरी कामगिरी केली. जितूने १७७.६ गुणांची कमाई करीत कांस्यपदकावर आपली मोहोर उमटवली. पात्रता फेरीत जितूने ५८३ गुणांसह आघाडीस्थान घेतले होते, मात्र पात्रता फेरीत त्याला अपेक्षेइतके सातत्य ठेवता आले नाही. अंतिम फेरीतील पहिल्या तीन नेमनंतर जितूकडे आघाडी होती. भारताच्याच ओंकार सिंगला आठव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
भारताने सांघिक विजेतेपद मिळवताना १७३४ गुणांची नोंद केली. त्यामध्ये जितू (५८३), गुरप्रीत (५७६) व ओंकार (५७५) यांचा महत्त्वाचा वाटा होता. कझाकिस्तानने रौप्यपदक तर सौदी अरेबियाने कांस्यपदक मिळवले.
कनिष्ठ विभागात भारताच्या सुमेध कुमारने १९९.१ गुणांची नोंद करीत सोनेरी कामगिरी केली. त्याचा सहकारी हेमेंद्रसिंग कुशावह याने १९५.२ गुणांसह रौप्यपदक पटकावले. कुशावहची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. भारताच्या मोहित गौरने युवा विभागात कांस्यपदक मिळविले. या प्रकारात भारताला रौप्यपदक मिळाले.