नवी मुंबई व गुवाहाटी येथे उपांत्य फेरीचे सामने

भारतात फुटबॉलचे माहेरघर मानल्या गेलेल्या कोलकाता शहरातील सॉल्ट लेक स्टेडियमला अपेक्षेप्रमाणे यंदा होणाऱ्या कनिष्ठ गटाच्या (१७ वर्षांखालील) मुलांच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना आयोजित करण्याची संधी मिळाली आहे. स्पर्धेतील उपांत्य फेरीचे सामने नवी मुंबई व गुवाहाटी येथे होणार आहेत.

भारतामध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाची (फिफा) स्पर्धा होणार असल्यामुळे या सामन्यांच्या ठिकाणांबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. ही स्पर्धा ६ ते २८ ऑक्टोबरदरम्यान होणार आहे. येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्याबरोबरच अनेक सामने होणार आहेत. नूतनीकरण करण्यात आलेल्या या स्टेडियममध्ये ८५ हजार प्रेक्षक बसू शकतील अशी सुविधा आहे.

[jwplayer aDOxuc39]

फिफाच्या स्पर्धा समितीचे मुख्य जेमी यार्झा यांच्या नेतृत्वाखाली आठ सदस्यांच्या शिष्टमंडळाने देशातील विविध ठिकाणांच्या तयारीचे निरीक्षण केले व त्याच्या आधारे स्पर्धेची ठिकाणे निश्चित केली. मडगाव, कोची व नवी दिल्ली येथेही या स्पर्धेतील सामने होणार आहेत. उपांत्य फेरीचा एक सामना नवी मुंबई येथील डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणार आहे, तर अन्य सामना गुवाहाटी येथील इंदिरा गांधी अ‍ॅथलेटिक्स स्टेडियमवर होईल. डी. वाय. पाटील स्टेडियमवर साखळी ‘अ’ गटातील काही सामने होणार असून गुवाहाटी येथे ‘इ’ गटातील साखळी सामने होतील. साखळी ‘ब’ गटातील सामने नवी दिल्ली येथे होतील. मडगाव येथे साखळी ‘क’ गटातील सामने होणार आहेत. कोची येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर उपांत्यपूर्व फेरीतील एका सामन्यासह तीन सामने होतील. त्याखेरीज ‘ड’ गटातील सामने तेथे आयोजित केले जाणार आहेत.

यार्झा यांनी सांगितले की, ‘ अन्य स्टेडियम्सच्या तुलनेत कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियम अंतिम फेरीसाठी योग्य असल्याचे आम्हाला वाटले, त्यामुळेच आम्ही नवी मुंबईपेक्षा त्या स्टेडियमवर अंतिम सामना आयोजित करण्याचा निर्णय घेतला. कोची येथील स्टेडियमला आम्ही काही सामने आयोजित करण्याची संधी दिली आहे, मात्र तेथील अनेक सुविधांमध्ये तत्परतेने सुधारणा करावी लागणार आहे. त्याकरिता आम्ही १५ मेपर्यंत त्यांना मुदत दिली आहे, अन्यथा तेथील सामने अन्य ठिकाणी घ्यावे लागतील. या स्टेडियम परिसरात अनेक गोदामांचा समावेश आहे व हीच खरी समस्या आहे.’

स्पर्धेची कार्यक्रम पत्रिका ७ जुलै रोजी निश्चित केली जाणार आहे.

[jwplayer WaLliReZ]