अंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती म्हणजेच आयसीसीच्या वार्षिक पुरस्कार जाहीर झाले आहेत. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार जाहीर झाला असल्याने सलग दुसऱ्या वर्षी हा पुरस्कार भारतीय खेळाडूला मिळणार आहे. विराटला यंदाच्या वर्षीचे तीन महत्वाचे सन्मान मिळाले आहेत. यामध्ये ‘आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर’, ‘आयसीसी ओडीआय क्रिकेटर ऑफ द इयर’ या दोन पुरस्कारांबरोबरच आयसीसीच्या कसोटी तसेच एकदिवसीय संघाचे कर्णधारपदाची माळही विराटच्याच गळ्यात पडली आहे.

क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार म्हणून देण्यात येणारी सर ग्रॅफिल्ड सोबर्स ट्रॉफी विराटला मिळणार आहे. मागील वर्षी हा पुरस्कार भारताचा अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन अश्विनला मिळाला होता. २१ सप्टेंबर २०१६ पासून डिसेंबर २०१७ पर्यंतच्या कामगिरीच्या आधारे २०१७ सालच्या या पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. या काळात विराटने कसोटी सामन्यांमध्ये ७७.८० च्या सरासरीने आठ शतकांच्या मदतीने २ हजार २०३ धावा कुटल्या आहेत. तर एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने सात शतकांच्या मदतीने ८२.६३च्या सरासरीने १ हजार ८१८ धावा केल्या आहेत. त्याशिवाय या कालावधीत टी-२० सामन्यांमध्ये विराटने १५३ च्या सरासरीने २९९ धावा केल्या आहेत.

क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार म्हणून देण्यात येणारी सर ग्रॅफिल्ड सोबर्स ट्रॉफी मला मिळणे हे माझ्यासाठी खूप खास असल्याचे मत विराटने हा पुरस्कार जाहिर झाल्यानंतर व्यक्त केले. हा माझा खूप मोठा सन्मान असल्याचे मी मानतो असे सांगतानाच सलग दोन वर्षे हा पुरस्कार भारतीय खेळाडूला मिळाल्याबद्दल विशेष आनंद वाटत असल्याचे विराटने सांगितले.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर विराटवर सर्व स्तरांमधून टिका होत असताना हा पुरस्कार घोषित झाला आहे.