इतिहासात दिल्लीचं तख्त वाचवायला अनेकवेळा मराठ्यांनी आपलं शोर्य रणांगणात दाखवल्याचे दाखले आहेत. आज त्याच इतिहासाची प्रो-कबड्डीच्या मैदानात पुनरावृत्ती झाली आहे. पहिल्या सत्रात १० गुणांनी पिछाडीवर असलेल्या दबंग दिल्लीच्या संघाने प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वाच्या पहिल्याच सामन्यात जयपूर पिंक पँथर्सवर मात केली आहे. इराणीयन खेळाडू मिराज शेखच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दबंग दिल्लीने अटीतटीच्या लढाईत मनजीत छिल्लरच्या जयपूर पिंक पँथर्सवर ३०-२६ अशी मात केली आहे.

सामन्याच्या पहिल्या सत्रात जयपूरच्या संघाने आपलं वर्चस्व गाजवलं होतं. मनजीत छिल्लर, जसवीर सिंह, पवन कुमार, तुषार पाटील सारखे रेडर्स आणि तितक्याच मजबूत बचावपटूंनी दिल्लीच्या संघाला बाद केलं. त्यामुळे पहिल्या सत्रात जयपूरच्या संघाकडे तब्बल १० गुणांची आघाडी होती. मात्र त्यानंतर दिल्लीच्या संघाने झुंजार वृत्ती दाखवत सामन्यात पुनरागमन केलं.

दिल्लीने आपल्या बलस्थानावर पॉईंट मिळवले –

या सामन्यात दिल्लीच्या रेडींग डिपार्टमेंटची मदार मिराज शेखवर होती. मात्र पहिल्या सत्रात त्याला सूर सापडला नसल्यामुळे दिल्लीचा संघ चाचपडताना दिसला. मात्र दिल्लीच्या संघातल्या बचावपटूंमध्ये संपूर्णपणे महाराष्ट्राच्या खेळाडूंचा भरणा होता. डाव्या कोपऱ्यावर निलेश शिंदे, उजव्या कोपऱ्यावर सुनील, मधल्या स्थानावर बाजीराव होडगे आणि विराज लांडगे यांनी जयपूरच्या रेडर्सवर आक्रमण करायला सुरुवात केली.

पहिल्या सत्रात दिल्लीच्या खात्यात जे काही पॉईंट आले होते. त्यात विराज लांडगेचा महत्वाचा वाटा होता. आपल्या कारकिर्दीत प्रो-कबड्डीचा पहिला सामना खेळणाऱ्या विराज लांडगेच्या डॅशने जयपूरच्या कसलेल्या रेडर्सनाही चकीत करुन सोडलं होतं. यानंतर अखेरच्या सत्रात बाजीराव होडगे आणि निलेश शिंदे यांनी आपल्या जुन्या फॉर्ममध्ये परत येत जयपूरच्या प्रत्येक रेडरवर हल्ला चढवला. जसवीर सिंहचे निलेश शिंदेने केलेल अँकल होल्ड तर केवळ बघण्यासारखे होते. प्रत्येक बळी घेतल्यानंतर निलेश शिंदे आपल्या संघाकडे पाहत तोंडावर बोट ठेवून आपण सामन्यात परत आल्याचं सांगत होता. त्याच्या या हटके स्टाईलला प्रेक्षकांनाही चांगली दाद दिली. बोनस घ्यायला येणाऱ्या खेळाडूचा दुसरा पाय पकडण्याची कला निलेश शिंदेच्या कसदार बचावात आहे. त्याचा फायदा आज दिल्लीला झाला. आजच्या सामन्यात निलेशने बचावात ५ पॉईंट घेतले.

दुसरीकडे बाजीराव होडगेनाही जसवीर आणि मनजीत छिल्लरसारख्या काही खेळाडूंना डॅश करत सामन्यात आपला जोर दाखवून दिला.

अबुफजल मग्शदूलू ठरला हुकुमाचा एक्का –
दबंग दिल्लीच्या संघासाठी इराणचा अबुफजल मग्शदूलू हुकुमाचा एक्का ठरला. पहिल्या सत्रात बदली खेळाडू म्हणून बाहेर बसलेल्या अबुफजलला पहिल्या सत्राच्या अखेरीस आणि दुसऱ्या सत्रात खेळण्याची संधी मिळाली. या संधीचा अबुफजलने पुरेपूर फायदा उचलला. पहिल्या सत्राच्या अखेरीस अबुफजलने केलेल्या खेळाने जयपूरचा संघ थोडासा बॅकफूटवर केला. ठराविक अंतराने अबुफजल आपल्या रेडमधून दिल्लीच्या संघासाठी पॉईंट घेत राहिला, ज्याचा जयपूर पिंक पँथर्स संघावर दबाव पडत गेला.

मोक्याच्या क्षणी मिराज शेखला सापडलेला सूर –

पहिल्या सत्रात कर्णधार मिराज शेखला एकही पॉईंट घेता आला नाही. याऊलट जयपूरच्या बचावपटूंनी त्याला सतत टार्गेट करत संघाबाहेर ठेवलं. मात्र ज्यावेळी आपल्या संघाची पॉईंटची गरज होती, त्यावेळी मिराज शेखने जयपूरच्या संघात खळबळ माजवत, संघाला महत्वाचे पॉईंट मिळवून दिले.

जयपूरच्या संघावर सतत दबाव ठेवण्यात दिल्लीचा संघ यशस्वी झाला, ज्याचा फायदा त्यांना अंतिम निकालात मिळाला. आतापर्यंत दबंग दिल्ली संघाने पर्वातला आपला पहिला सामना कधीही जिंकला नव्हता, मात्र आज मिराज शेखच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघाने हा इतिहास पुसून काढत पर्वाची सुरुवात विजयाने केली आहे.