महिला आशिया चषक हॉकी स्पध्रेची आज अंतिम लढत

भारताच्या पुरुष हॉकी संघाच्या आशिया चषक विजयाने प्रेरित झालेल्या महिला खेळाडू रविवारी महिला आशिया चषक स्पध्रेच्या अंतिम लढतीत चीनच्या आव्हानासाठी सज्ज झाल्या आहेत. या स्पध्रेचे जेतेपद पटकावून स्वत:च्या हिमतीवर पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषक स्पध्रेची पात्रता मिळवण्याचा निर्धार भारतीय खेळाडूंनी केला आहे. ‘‘ही स्पर्धा जिंकून विश्वचषक स्पध्रेची पात्रता मिळवण्याचा आमचा मानस आहे,’’ असे भारतीय संघाची कर्णधार राणीने सांगितले.

या स्पध्रेत भारतीय संघाने सातत्यपूर्ण खेळ करताना अपराजित राहण्याची किमया साधली आहे. त्यात उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीत अनुक्रमे बलाढय़ कझाकस्तान आणि गतविजेत्या जपानला नमवल्याने भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वासही प्रचंड वाढला आहे.

‘‘भारतीय पुरुष संघाच्या आशिया चषक विजयाने आम्हाला प्रेरणा मिळाली आहे. आता जेतेपद पटकावण्याची आमची वेळ आहे. ड्रेसिंग रूममधील वातावरण आनंददायी आहे आणि अंतिम सामन्यासाठी सर्वच उत्सुक व तयारीत आहेत,’’ असे राणीने सांगितले.

या स्पध्रेतील भारताची कामगिरी उजवी ठरली आहे. पाचही सामन्यांत भारताने विजय मिळवले असून त्यात चीनविरुद्धच्या विजयाचाही समावेश आहे. त्यामुळे अंतिम लढतीत भारताचे पारडे जड मानले जात आहे, परंतु राणीने अंतिम लढतीत चीनला कमी लेखण्याची चूक करणार नसल्याचे स्पष्ट केले. ती म्हणाली, ‘‘चीनचा संघ चांगला आहे आणि त्यांच्या खेळाडूंचा अंदाज बांधणे अवघड आहे. त्यामुळे त्यांना कमी लेखणार नाही. आम्ही आमच्या रणनीतीनुसारच खेळ करणार आहोत.’’

गतवर्षी झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पध्रेत साखळी सामन्यात चीनने ३-२ अशा फरकाने भारतावर विजय मिळवला होता, परंतु अंतिम लढतीत भारतीय महिलांनी दमदार खेळ करताना २-१ अशा विजयासह चीनला परतफेड केली. आशिया चषक स्पध्रेत भारताने एकूण २७ गोल केले आहेत. पेनल्टी कॉर्नर आणि मैदानी गोल यांच्यावर भारतीय खेळाडूंचे वर्चस्व जाणवले आहे.

०८

जपानमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पध्रेत भारताकडून गुर्जीत कौरने सर्वाधिक ८ गोल नोंदवले आहेत आणि सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंमध्ये ती तिसऱ्या स्थानावर आहे.

१३

भारतीय महिला संघाने १३ वर्षांपूर्वी (२००४ साली) आशिया चषक स्पर्धा जिंकली होती. अंतिम लढतीत त्यांनी जपानवर १-० अशी बाजी मारली होती.

२००९

बँकॉक, थायलंड येथे २००९च्या आशिया चषक स्पध्रेच्या जेतेपदाच्या सामन्यात भारत आणि चीन समोरासमोर आले होते आणि त्यात चीनने ५-३ असा विजय मिळवला होता.

२०१३

भारत आणि चीन यांच्यात २०१३च्या आशिया चषक स्पध्रेतील कांस्यपदकाचा सामना झाला होता आणि त्यात भारताने पेनल्टी शूटआऊटमध्ये ३-२(२-२) अशी मात केली होती.