स्वदेश घाणेकर, मुंबई

मतदानाचा हक्क मिळवण्यास पात्रही न ठरलेल्या, शालेय अभ्यासक्रमात डोके खुपसून बसलेल्या भारतीय खेळाडूंनी गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेत अप्रतिम कामगिरी करत जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. भारताच्या या युवा फळीत आपल्याला भविष्यातील आशियाई आणि ऑलिम्पिक पदकविजेते दिसत आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेची हीच खरी गंमत आहे की, येथे भारताला भविष्यातील तारे शोधण्याची संधी मिळते.

देशाने जिंकलेल्या ६६ पदकांपैकी जवळपास ३७.८७ टक्के म्हणजे २५ पदके ही युवा खेळाडूंनी जिंकली आहेत आणि भविष्याच्या दृष्टीने त्यांचे लक्ष्य निश्चित आहे. एक तर आशियाई स्पर्धा आणि पुढील २०२०ची टोकियो ऑलिम्पिक. त्यामुळे या युवा वर्गावर यापुढे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. नेमबाज मनू भाकर (१६ वष्रे), अनिष भानवाल (१५), मेहूली घोष (१७), वेटलिफ्टिंगपटू दीपक लाथेर (१८), कुस्तीपटू दिव्या कारकान (१९), भालाफेकपटू नीरज चोप्रा (२०), टेबल टेनिसपटू मनिका बत्रा (२२) यांचा प्रामुख्याने उल्लेख करायला हवा.

या यादीत आणखी नावे जमा होण्यासारखी आहेत. मात्र या खेळाडूंकडे वय आणि ही ध्येयनिश्चिती या दोन्ही जमेच्या बाजू असल्याने टोकियोच्या दृष्टीने यांचे महत्त्व अधिक अधोरेखित करावे लागेल. यामध्येही आघाडी घेईल ती मनिका.  या खेळाडूंमध्ये मनिका वयाने थोडी मोठी आहे. मात्र राष्ट्रकुल स्पर्धेतील तिच्या कामगिरीने सर्वाचे लक्ष वेधले. सर्वाधिक चार पदके जिंकणारी ती एकमेव भारतीय खेळाडू आहे. या २२ वर्षीय खेळाडूने खेळावर लक्ष केंद्रित करता यावे म्हणून महाविद्यालयीन शिक्षणाला रामराम केला. तिच्या या निर्णयाचे सार्थक झाले. भविष्यात तिच्याकडून असलेल्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

नीरजच्या कामगिरीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. राष्ट्रकुल स्पर्धेतील त्याने फेकलेल्या ८६.४७ मीटर अंतरापर्यंतच्या भालाफेकीच्या जवळपास एकही प्रतिस्पर्धी फिरकू शकला नाही. या प्रकारात सुवर्ण जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. नीरज सातत्याने चांगली कामगिरी करत आहे आणि त्यामुळेच कनिष्ठ गटातील विश्वविक्रम नावावर करूनही तो तिथवरच थांबला नाही. स्पर्धेगणिक आणखी प्रगती करण्याची जिद्द त्याला स्वस्थ बसू देत नाही आणि त्यामुळेच आशियाई व ऑलिम्पिक स्पर्धेत त्याच्याकडून पदकाच्या अपेक्षा आहेत.

मनू भाकरही याच प्रयोगशील पंगतीतली. सतत विविध खेळांत सहभाग घेऊन तिने नेमबाजीला निवडले. मागील चारेक महिन्यात तिने ४-५ सुवर्णपदक आपल्या नावावर केली आहेत. यात राष्ट्रकुल स्पर्धेतील पदक महत्त्वाचे म्हणावे लागेल. पदार्पणातच तिने हीना सिधूसारख्या कसलेल्या नेमबाजावर कुरघोडी करत हे यश मिळवले. अनिष, मेहूली यांच्याकडूनही आगामी स्पध्रेत पदकांची अपेक्षा आहे. अ‍ॅथलेटिक्स, नेमबाजी, वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग, कुस्ती आणि टेबल टेनिसमध्ये भारताकडे उदयोन्मुख युवा खेळाडू आहेत आणि भविष्यात त्यांच्यावर विशेष लक्ष दिल्यास भारताला आशियाई आणि ऑलिम्पिक पदकांचे स्वप्न साकार करणे तितके कठीण राहणार नाही, हे निश्चित.

मिलिंद ढमढेरे, पुणे

इच्छाशक्तीला आत्मविश्वास व मेहनतीची जोड दिली तर जागतिक स्तरावरील क्रीडा स्पर्धेत सोनेरी कामगिरी करता येते, हेच भारताच्या काही तिशीपल्याड खेळाडूंनी गोल्ड कोस्ट येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सिद्ध केले.

केवळ भारतीयांसाठी नव्हे तर अन्य देशांकरिताही सुपरमॉम असलेली बॉक्सर एम.सी. मेरी कोम, सोनेरी हॅट्ट्रिक करणारा कुस्तीपटू सुशील कुमार, ऐतिहासिक कामगिरी करणारे टेबल टेनिसपटू मौमा दास व अचंता शरथ, संसार व खेळ या दोन्ही आघाडय़ा समर्थपणे सांभाळणारी तेजस्विनी सावंत, अ‍ॅथलेटिक्समध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणारी सीमा पुनिया आदी खेळाडूंनी यंदा राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला पदकांची लयलूट करण्यासाठी मोठा हातभार लावला.

मेरी कोमने ऑलिम्पिकमध्ये बॉक्सिंगमध्ये कांस्यपदक मिळवताना ऑलिम्पिक पदक विजेती पहिली भारतीय बॉक्सर होण्याचा मान मिळवला होता. त्या वेळी तिला दोन जुळी मुले होती. आपल्या मुलांपासून शेकडो मैल दूर राहून तिने ऑलिम्पिक पदकासाठी अनेक महिने सराव केला होता. ऑलिम्पिक पदकानंतर तिसरा मुलगा झाल्यानंतरही तिची कारकीर्द संपलेली नाही. पाच वेळा जागतिक विजेतेपद मिळविणाऱ्या मेरी कोमने राष्ट्रकुल स्पर्धेत भाग घेतला नव्हता. यंदा राष्ट्रकुल स्पर्धेत तिने पदार्पण करतानाच सुवर्णपदक जिंकण्याचे ध्येय ठेवले होते. त्यासाठीही तिने भरपूर मेहनत घेतली होती. तिने प्रत्येक लढतीत आपला अनुभव व आक्रमकता यांचा सुरेख समन्वय ठेवीत वर्चस्व गाजविले व सुवर्णपदकावर मोहोर नोंदविली.

कोल्हापूरच्या तेजस्विनीने २००६ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत दोन सुवर्णपदके जिंकली होती. २०१० च्या राष्ट्रकुल स्पर्धेत तिने तीन रौप्यपदके मिळवली होती. त्यानंतर बराच काळ स्पर्धात्मक नेमबाजीपासून ती दूर होती. तथापि यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भाग घेताना अव्वल कामगिरी करण्यासाठी तिने खूप सराव केला. तिने यंदा एक सुवर्ण व एक रौप्य अशी दोन पदके मिळवली. ३७ व्या वर्षीही तिचा उत्साह अतुलनीय आहे. तिच्यासारखीच आणखी एक उत्साही खेळाडू म्हणजे सीमा पुनिया. तिने अ‍ॅथलेटिक्समध्ये यंदा थाळीफेकीत रौप्यपदक मिळवले. आतापर्यंत तिने राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासात तीन रौप्य व एक कांस्यपदक मिळवले आहे. ३४ वर्षीय सीमा हिने २०१४ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. त्याची पुनरावृत्ती यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत करण्याचे तिचे ध्येय आहे.

टेबल टेनिसमध्ये यंदा भारतीय खेळाडूंनी पुरुष व महिला विभागातील सांघिक गटात अजिंक्यपद पटकाविले. महिलांमध्ये प्रथमच भारतास विजेतेपद मिळाले. सिंगापूरसारख्या मातब्बर संघावर मात करीत त्यांनी हे यश मिळवले. त्यांच्या या यशात कौतुकास्पद वाटा उचलणारी मौमा ही ३४ वर्षांची असली तरीही तिचे कौशल्य व आत्मविश्वास युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायकच आहे. उंची लहान पण कीर्ती महान अशीच ती चतुरस्र खेळाडू आहे. ती उंचीने लहान असली तरी तिने यंदा महिला दुहेरीतही रौप्यपदकाची कमाई केली.

सुशील कुमारने कुस्तीत स्वत:चा स्वतंत्र ठसा उमटविला आहे. ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक विभागात एक रौप्य व एक कांस्यपदक मिळवणारा तो एकमेव भारतीय खेळाडू आहे. त्याचप्रमाणे त्याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत लागोपाठ तीन वेळा सुवर्णपदक मिळवीत अनोखी हॅट्ट्रिक केली आहे. ही हॅट्ट्रिक पूर्ण करताना त्याने अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेच्या योहानस बोथा याच्यावर अवघ्या ८० सेकंदांत मात केली होती. या स्पर्धेसाठी त्याच्या निवडीबाबत वादंग निर्माण झाले होते. त्याच्यापेक्षा आपण जास्त चांगले यश मिळवू शकतो, असा दावा परवीन राणाने केला होता. तथापि सुशीलने आपल्या कामगिरीनेच सर्वाना चोख उत्तर दिले आहे.

ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत दोन पदके मिळवली असली तरी सुवर्णपदकावर नाव कोरण्यासाठी माझी भूक कायमच राहणार आहे. रिओ ऑलिम्पिकच्याच वेळी मला ही कामगिरी करायची होती, मात्र माझी निवड झाली नाही. यंदा राष्ट्रकुलमध्ये तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवीत माझ्याकडे ऑलिम्पिक पदक मिळविण्याची क्षमता आहे हे मी कामगिरीद्वारेच सिद्ध केले आहे. यंदाची आशियाई क्रीडा स्पर्धा त्यासाठी रंगीत तालीम आहे.

– सुशील कुमार

राष्ट्रकुल स्पध्रेतील युवा फळी (वय)

  • अ‍ॅथलेटिक्स : नीरज चोप्रा (२०), नवजीत ढिल्लोन (२३)
  • बॉक्सिंग : गौरव सोलंकी (२१), अमित पांघम (२२), मनिष कौशिक (२२), हुस्सामुद्दीन मोहम्मद (२४), नमन तन्वर (१९)
  • नेमबाजी : अनिष भानवाल (१५), मनू भाकर (१६), मेहूली घोष (१७), ओम मिथरवाल (२२), अंजुम मुदगिल (२४)
  • टेबल टेनिस : मनिका बत्रा (२२), जी साथीयन (२५)
  • वेटलिफ्टिंग : वेंकट राहुल रगाला (२१), दीपक लाथेर (१८), पूनम यादव (२२), संजित चानू (२४), गुरुराजा (२३), मिराबाई चानू (२३)
  • कुस्ती : बजरंग (२४), विनेश फोगाट (२३), पूजा धांडा (२४), दिव्या काकरान (१९).