रॉबीन सिंगचा निर्णायक गोल; ग्वामचा पराभव
पीटीआय, बंगळुरू
सलग पाच पराभवांनंतर भारतीय फुटबॉल संघाने २०१८च्या फुटबॉल विश्वचषक स्पध्रेच्या पात्रता फेरीत अखेर विजयाची चव चाखली. बंगळुरू येथील कांतीरावा स्टेडियमवर गुरुवारी झालेल्या लढतीत रॉबीन सिंगने नोंदवलेला गोल निर्णायक ठरला आणि भारताने ग्वामवर १-० असा विजय नोंदवला. विश्वचषक स्पध्रेच्या शर्यतीतून भारतीय संघ आधीच बाद झाला असला तरी हा विजय २०१९मध्ये होणाऱ्या आशियाई चषक स्पध्रेची पात्रता मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.
ग्वामकडून त्यांच्या घरच्या मैदानावर झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याच्या निर्धाराने मैदानात उतरलेल्या भारताने सुरुवातीपासून आक्रमक खेळावर भर दिला. दहाव्या मिनिटाला गुरप्रीत आणि सुनील छेत्री यांच्या लाजवाब पासिंगवर रॉबीन सिंगने गोल करून भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर भारतानेच वर्चस्व गाजवले. ४१व्या मिनिटाला सेहंजल सिंगला लाल कार्ड दाखवण्यात आल्याने भारताला दुसऱ्या सत्रात दहाच खेळाडूंसह खेळ करावा लागला. परंतु तरीही भारताने ग्वामला कडवी झुंज देत अखेपर्यंत आघाडी कायम राखून विजय निश्चित केला.