भारतीय संघातील भरवशाचा शैलीदार मुंबईकर फलंदाज अजिंक्य रहाणे यानं २०१८ साल हे आपलंच असेल असे आत्मविश्वासपूर्ण उद्गार काढले आहेत. माझं मन मला सांगतंय की येणारं वर्ष माझं असेल असं रहाणेनं एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत नमूद केलं आहे.
क्रिकेट असो की जगणं मी जिथं असेन तिथं सर्वस्व देतो असं सांगत अजिंक्यनं आपण वर्तमानाला महत्त्व देत असल्याचे व समोर येणाऱ्या स्थितीवर लक्ष केंद्रीत करत असल्याचं म्हटलं आहे.

त्यामुळे याक्षणी अजिंक्यचं सगळं लक्ष आहे दक्षिण अफ्रिकेच्या दौऱ्यावर… सर्वोत्कृष्ट कामगिरी करायची हे एकमेव लक्ष्य या क्षणी माझ्या डोक्यात आहे, अजिंक्य सांगतो. प्रत्येक दिवस वेगळा असतो, प्रत्येक दिवशीचा खेळ हा वेगळा असतो हे ही वास्तव असल्याचं त्यानं म्हटलंय.
अफ्रिकेच्या दौऱ्यासाठीच्या तयारीबद्दल बोलताना रहाणे म्हणतो की, ज्यावेळी तुम्ही कसोट क्रिकेटचा विचार करता त्यावेळी अनेक बाबी विचारात घ्याव्या लागतात. दक्षिण अफ्रिकेसाठी घरची मालिका आहे, त्यांची गोलंदाजी, त्यांचं हवामान या सगळ्याचा विचार सतत करावा लागतो. मोठी धावसंख्या उभारणं असो की त्यांचा संघ दोवनेळा गुंडाळणं असो याचा सातत्यानं विचार करून तयारी करावी लागते आणि तिथं गेल्यावर केलेला गृहपाठ रोजच्या रोज प्रत्यक्षात उतरवायचं आव्हान असतं. त्यासाठी आम्हाला इथं आत्ता परीश्रम घ्यावे लागत असल्याचे अजिंक्यनं नमूद केलं आहे.

तिथलं हवामान याबद्दल खूप काही सांगितलं जातं, याबाबत बोलताना अजिंक्य म्हणतो की हा सगळा मानिसकतेचा भाग आहे. आपल्याला काय साधायचंय याचा विचार करायचा आणि जणू काही आपण भारतातच खेळत आहोत इतक्या आत्मविश्वासानं तिथं खेळायचं हे साधणं महत्त्वाचं असल्याचं त्यानं म्हटलं आहे.

दक्षिण अफ्रिकेत जिंकायचं असेल तर खुलेपणानं खेळायला हवं, गेल्या दोन वर्षांमध्ये ज्या प्रकारे भारतीय क्रिकेटपटू खेळलेत ते सुरू ठेवायला हवं असं रहाणे म्हणाला. असं केलं आपण भारतात आहोत की विदेशात काही फरक पडत नाही असं त्याचं म्हणणं आहे.

यश अपयशाबाबत बोलताना अजिंक्य म्हणाला की काहीवेळा यश मिळवण्यासाठी झगडावं लागतं. पण ही गोष्ट प्रत्येक ठिकाणी लागू होते. जसं आपण यशाला महत्त्व देतो तसंच अपयशालाही द्यायला हवं. मी दोन्ही गोष्टी फारशा गांभीर्यानं घेत नाही असं सांगताना अजिंक्यनं जोपर्यंत आपण दोन्हींमधून काही ना काही शिकत आहोत तोपर्यंत काळजी करण्याचं कारण नाही असं म्हटलं आहे. झगडण्याच्या काळात आपण खूप काही शिकलो असल्याचं सांगणाऱ्या अजिंक्यनं येतं वर्ष मात्र आपलंच असं आत्मविश्वासानं नमूद केलं आहे.