News Flash

जागतिक बॅडमिंटन मालिकेचा अंतिम टप्पा : अखेर सिंधूला विजयाचा दिलासा

सिंधूला पहिल्या गेममध्ये सुरुवातीला झगडायला लावून बिंग जियाओने ७-३ अशी आघाडी घेतली होती

| December 14, 2019 03:16 am

संघर्षपूर्ण सामन्यात जियाओवर मात

गुवांगझोऊ : ‘बीडब्ल्यूएफ’ जागतिक बॅडमिंटन मालिकेच्या अंतिम टप्प्यातील आव्हान आधीच संपुष्टात आलेल्या पी. व्ही. सिंधूने शुक्रवारी अ-गटातील तिसऱ्या आणि अखेरच्या साखळी लढतीत विजय मिळवला. तिने चीनच्या ही बिंग जियाओला रंगतदार लढतीत नमवले.

गुरुवारी सलग दुसऱ्या पराभवानंतर सिंधूला आपले जेतेपद टिकवता येणार नाही, हे स्पष्ट झाले. मात्र सिंधूने बिंग जियाओला २१-१९, २१-१९ असे नामोहरम करून अ-गटात तिसऱ्या स्थानावर समाधान मानले. सिंधूने बिंग जियाओविरुद्धची सलग चार पराभवांची मालिका खंडित करताना तिच्याविरुद्धच्या सामन्यांतील कामगिरी ६-९ अशी सुधारली आहे.

सिंधूला पहिल्या गेममध्ये सुरुवातीला झगडायला लावून बिंग जियाओने ७-३ अशी आघाडी घेतली होती. मग ११-६ अशी ही आघाडी वाढवली. सिंधूच्या चुकांमुळे बिंग जियाओने १८-९ अशा फरकाने आघाडी घेत पहिला गेम जिंकण्याकडे वाटचाल केली. परंतु सिंधूने दमदार पुनरागमन करताना नऊ सलग गुण मिळवत १८-१८ अशी अनपेक्षित बरोबरी साधली. मग बिंग जियाओनेही १९-१९ अशी बरोबरी साधली. परंतु सिंधूने संधी निसटू न देता दोन सलग गुणांनिशी पहिला गेम खिशात घातला.

दुसऱ्या गेममध्ये सिंधूने आत्मविश्वासाने खेळत ७-३ अशी प्रारंभी आघाडी घेतली. मग ११-६ अशी ती वाढवली. त्यानंतर बिंग जियाओच्या हातून चुका झाल्यामुळे सिंधूने विजयाच्या दिशेने १५-१० अशी वाटचाल केली. परंतु बिंग जियाओने सहजासहजी हार न मानता ही दरी १६-१८ अशी कमी केली. परंतु सिंधूने प्रदीर्घ रॅलीसह एक गुण जिंकला आणि त्यानंतर जिद्दीने खेळत दुसऱ्या गेमसह सामना जिंकला.

सिंधूचे सामने

’पराभूत वि. अकाने यामागुची २१-१८, १८-२१, ८-२१

’पराभूत वि. चेन युफेई  २२-२०, १६-२१, १२-२१

’विजयी वि. ही बिंग जियाओ २१-१९, २१-१९

सिंधूची कामगिरी

०३ सामने ०१ विजय ०२ पराजय ०१ गुण

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2019 3:16 am

Web Title: 2019 bwf world tour finals bwf world tour finals pv sindhu zws 70
Next Stories
1 ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड कसोटी मालिका : स्टार्कपुढे न्यूझीलंडच्या फलंदाजांची भंबेरी
2 महिलांची तिरंगी फुटबॉल स्पर्धा : भारतीय कुमारींचा संघ स्वीडनकडून पराभूत
3 आंबेकर स्मृती कबड्डी स्पर्धा : चिनू स्पोर्ट्स क्लब, शिवशक्तीला जेतेपद
Just Now!
X