‘करोना’च्या सावटामुळे आयोजक सतर्क

टोक्यो : टोक्यो ऑलिम्पिक ‘करोना’ विषाणू संसर्गामुळे दोन वर्षेदेखील लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात येऊ शकतो. ऑलिम्पिक आयोजन समितीचे संचालक मंडळाचे सदस्य हारुयुकी ताकाहाशी यांनी ही बाब स्पष्ट केली.

‘‘ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा रद्द होतील असे वाटत नाही याउलट त्या पुढे ढकलण्यात येऊ शकतात. जर ऑलिम्पिक पुढे ढकलला तर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी) अडचणीत येऊ शकेल,’’ असे ताकाहाशी यांनी स्पष्ट केले.

ऑलिम्पिक रद्द करण्याचा प्रश्नच नाही – सिको हाशिमोटो

टोक्यो ऑलिम्पिक पुढे ढकलण्याचा किंवा रद्द करण्याचा प्रश्नच येत नाही, असा पुनरुच्चार जपानच्या क्रीडामंत्री सिको हाशिमोटो यांनी केला आहे. ‘‘टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सर्वात महत्त्वाचे असतात ते खेळाडू. चार वर्षांतून एकदा होणाऱ्या या ऑलिम्पिकमध्ये तयारीसाठी खेळाडू रात्रंदिवस एक करत असतात. या स्थितीत ऑलिम्पिक रद्द करण्याचा किंवा पुढे ढकलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,’’ असे सिको हाशिमोटो यांनी सांगितले. ‘‘ऑलिम्पिक संदर्भातील अंतिम निर्णय आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी) घेईल. सरकारकडून जर वेळीच उपयुक्त माहिती देण्यात आली तर ‘आयओसी’ला निर्णय घेणे सोपे होईल,’’ असे हाशिमोटो यांनी स्पष्ट केले. ‘करोना’मुळे ऑलिम्पिक दोन वर्षांसाठी पुढे ढकलण्यात येऊ शकते, असे ऑलिम्पिक आयोजक सदस्यांनी स्पष्ट केल्यानंतर हाशिमोटो यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

इंडिया खुली बॅडमिंटन स्पर्धा प्रेक्षकांशिवाय

नवी दिल्ली येथे २४ मार्च ते २९ मार्च या कालावधीत होणारी इंडिया खुली बॅडमिंटन ‘सुपर ५००’ प्रकारातील स्पर्धा यंदा प्रेक्षकांशिवाय होणार आहे. ‘करोना’ विषाणू संसर्ग फैलावायला मदत होऊ नये, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे, असे भारतीय बॅडमिंटन संघटनेकडून (बीएआय) स्पष्ट करण्यात आले.

नवी दिल्लीत होणारी ही स्पर्धा टोक्यो ऑलिम्पिक पात्रता स्पर्धामधील मुख्य स्पर्धा आहे. ‘‘नवी दिल्लीत होणारी इंडिया खुली बॅडमिंटन स्पर्धा नियोजित वेळेप्रमाणे होणार आहे. मात्र त्याच वेळेला खेळाडूंच्या आरोग्याची काळजीदेखील घ्यायची आहे. प्रेक्षकांना आम्ही स्टेडियममध्ये प्रवेश देणार नाही. मात्र त्यांना सामने यूटय़ूब वाहिनीवरून बघता येतील. हॉटस्टार वाहिनीवर उपांत्यपूर्व फेरीपासूनच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण होईल,’’ असे ‘बीएआय’चे सरचिटणीस अजय सिंघानिया यांनी सांगितले.

आतापर्यंत चार ऑलिम्पिक पात्रता बॅडमिंटन स्पर्धा ‘करोना’मुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत. लिंगशुई चीन मास्टर्स (२५ फेब्रुवारी ते १ मार्च), व्हिएतनाम आंतरराष्ट्रीय स्पर्धा (२४ ते २९ मार्च), जर्मन स्पर्धा (३ ते ८ मार्च), पोलिश स्पर्धा (२६ ते २९ मार्च) या चार स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. नवी दिल्लीतील इंडिया खुली स्पर्धेनंतर मलेशिया (३१ मार्च ते ५ एप्रिल) आणि सिंगापूर (७ एप्रिल ते १२ एप्रिल) या ऑलिम्पिक पात्रता प्रकारातील स्पर्धा खेळण्यात येणार आहेत.

‘साइ’ बेंगळूरुतील दक्षिण विभाग बंद

भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साइ) बेंगळूरुतील दक्षिण विभाग केंद्र ‘करोना’च्या पार्श्वभूमीवर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण बेंगळूरुमध्ये ‘करोना’चे चार रुग्ण आढळले आहेत. ‘‘करोनामुळे ‘साइ’चे केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण या ठिकाणी आघाडीचे खेळाडू सराव करतात. खेळाडूंच्या आरोग्याला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे,’’ असे ‘साइ’कडून स्पष्ट करण्यात आले. भारताचे महिला आणि पुरुष हॉकी संघदेखील या ठिकाणी सराव करतात.

आर्सेनलचे खेळाडू विलगीकरणात

अन्य खेळांप्रमाणे इंग्लिश प्रीमियर लीगलादेखील (ईपीएल) सामने पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा लागला. कारण आर्सेनल संघाच्या खेळाडूंचे विलगीकरण करताना त्यांना घरीच थांबण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परिणामी आर्सेनलची बुधवारी मॅँचेस्टर सिटीविरुद्ध होणारी लढत पुढे ढकलण्यात आली आहे. ‘करोना’मुळे ‘ईपीएल’ची लढत पुढे ढकलण्यात आल्याची ही पहिलीच वेळ आहे. ‘करोना’ संसर्ग झालेल्या ग्रीसच्या क्लबच्या मालकाच्या संपर्कात आर्सेनलचे खेळाडू नुकतेच आले होते. या स्थितीत नियमाप्रमाणे १४ दिवस त्यांना घर सोडण्यास मज्जाव करण्यात आला आहे.