विम्बल्डन टेनिस खुली स्पर्धा या वर्षी करोना विषाणूच्या संसर्गामुळे रद्द करावी लागली असली तरी पुढील वर्षी प्रेक्षकांसह अथवा प्रेक्षकांशिवाय आयोजन करण्याच्या दृष्टीने आयोजकांची तयारी सुरू झाली आहे.

ऑल इंग्लंड क्लबचे मुख्य अधिकारी सॅली बोल्टन यांनी आयोजकांसमोर विम्बल्डनच्या आयोजनाचे सध्या एकमेव उद्दिष्ट ठेवले आहे. ‘‘२०२१मध्ये कोणत्याही स्थितीत विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेचे आयोजन आम्हाला करायचे आहे. त्याच वेळेला खेळाडूंचे, कर्मचाऱ्यांचे आणि प्रेक्षकांचे आरोग्य जपण्याला प्राधान्य असेल. करोना साथीच्या काळात नेमके कशाला प्राधान्य देणे गरजेचे आहे, हे आम्ही समजून घेणार आहोत,’’ असे बोल्टन यांनी स्पष्ट केले.

या वर्षांतील अन्य तीन ग्रँडस्लॅम स्पर्धा झाल्या असल्या तरी विम्बल्डन १९४५ नंतर प्रथमच रद्द करण्यात आली. विम्बल्डनचे पुढील वर्षी २८ जून ते ११ जुलैदरम्यान आयोजन होणे अपेक्षित आहे. आता ही स्पर्धा प्रेक्षकांशिवाय खेळवायची की प्रेक्षकांना परवानगी द्यायची, याबाबतचा निर्णय मात्र अजून झालेला नाही. पुढील वर्षांच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारीमध्ये ऑस्ट्रेलियन खुली स्पर्धा होणार आहे. त्यासाठी १४ दिवसांच्या विलगीकरणाच्या नियमातून परदेशी खेळाडूंना वगळावे, अशी मागणी नुकतीच त्या स्पर्धेच्या आयोजकांनी सरकारकडे केली आहे.