लेझीम, पोवाडा, लावणी आदी महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलांचे प्रतिबिंब असलेल्या उद्घाटन सोहळय़ाने पुण्यात मंगळवारी २०व्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेस प्रारंभ होणार आहे. शिवछत्रपती क्रीडानगरीत मंगळवारी होणाऱ्या उद्घाटन समारंभात महाराष्ट्राच्या विविध कलासंस्कृतीची ओळख परदेशी खेळाडूंना व्हावी यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. साधारणपणे एक तास चालणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात लेझीम, पोवाडा, लावणी, कोळीनृत्य, आसामचे बिहू नृत्य, कथकली, मुजरा नृत्य, बॉलिवूडचे नृत्य आदींचा समावेश आहे. त्याखेरीज मलखांब, योगासने, दांडपट्टा याचीही प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत. लेट्स प्ले स्पोर्ट्स मॅनेजमेंटकडे या कार्यक्रमाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या कार्यक्रमात मुंबई, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी आदी ठिकाणची साडेतीनशे मुले-मुली सहभागी होणार आहेत.
क्रीडानगरी सजली!
२००८मध्ये झालेल्या राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेनंतर आगामी आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेसाठी बालेवाडीतील क्रीडानगरी पुन्हा एकदा सजली आहे. या स्टेडियममध्ये खेळाडूंच्या स्वागतासाठी कमानी उभारण्यात आल्या आहेत. त्याखेरीज क्रीडानगरीकडे येणाऱ्या रस्त्यांवरही आकर्षक पोस्टर्स लावण्यात आली आहेत. स्टेडियममध्ये अनेक ठिकाणी रंगरंगोटी करण्यात आली आहे. विविध देशांच्या खेळाडूंच्या मदतीसाठी ३०० स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे.