भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी. मात्र वैयक्तिक अहंकार आणि संघटनेतील अंतर्गत बंडाळ्या या अनागोंदीमुळे गेल्या २१ वर्षांत २१ प्रशिक्षकांची नियुक्ती होऊन त्यांना डच्चू दिल्याचे स्पष्ट झाले आहे. वर्षांला एक प्रशिक्षक अशा नामुष्कीकारक आकडेवारीमुळे हॉकीमध्ये आंतराष्ट्रीय स्तरावर सातत्याने होणाऱ्या घसरणीचे कारणही उघड झाले आहे. १९९४ ते २००८ या कालावधीत केपीएस गिल हॉकी इंडियाच्या प्रमुखपदी होते. त्यांच्या कालखंडात तब्बल १७ प्रशिक्षकांची नियुक्ती झाली आणि त्यांची हकालपट्टी करण्यात आली. गिल यांचे उत्तराधिकारी बात्रा यांच्या फक्त पाच वर्षांच्या कार्यकाळात पाच प्रशिक्षक कामावेगळे झाले आहेत. जोस ब्रासा, हरिंदर सिंग, मायकेल नॉब्स, टेरी वॉल्श यांच्यापाठोपाठ व्हॅन अ‍ॅस यांची गच्छंती झाली आहे.
अँटवर्प, बेल्जियम येथे झालेल्या जागतिक हॉकी लीग स्पर्धेदरम्यान पॉल व्हॅन अ‍ॅस आणि नरिंदर बात्रा यांच्यात भांडण झाले होते. कडक शिस्तीसाठी ओळखले जाणारे आणि मूळचे उद्योजक असलेल्या व्हॅन अ‍ॅस यांनी आपल्या कार्यपद्धतीविषयी खेळाडूंना सविस्तर माहिती दिली होती. खेळाडूच्या वलयापेक्षा त्याच्या कामगिरीला महत्त्व असेल. आणि कामगिरी चांगली झाली तर कोणाचीही गय केली जाणार नाही असे व्हॅन अ‍ॅस यांनी सांगितले होते. भारतातून नेदरलँड्सकरिता रोज विमान रवाना होते. ज्या क्षणी परिस्थिती अनुकूल नाही असे वाटेल तत्क्षणी मी परतीच्या मार्गावर असेन असे व्हॅन अ‍ॅस यांनी स्पष्ट केले होते. खेळाडूंना त्यांची कार्यपद्धती आवडली होती मात्र हॉकी इंडियातील पदाधिकाऱ्यांना ही पद्धत पसंत पडली नाही.
पूर्व जर्मनीतील एक कंपनी व्हॅन अ‍ॅस यांनी ताब्यात घेतली. काही महिन्यांतच डबघाईला आलेल्या या कंपनीचा व्हॅन अ‍ॅस यांनी कायापालट केला. याच काळात एचजीसी क्लबचे अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली. त्यांनी क्लबला प्रायोजक मिळवून दिले आणि नंतर त्यांच्या प्रशिक्षकपदामध्येच क्लबने युरो हॉकी लीगच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. प्रशिक्षक म्हणून काम करताना क्लबचे सर्वोत्तम खेळाडू ताइके ताइकेमा आणि तेयून डि नाइजर या दोघांना त्यांनी डच्चू दिला होता. व्हॅन आपल्या निर्णयावर ठाम राहिले. नेदरलँड्सच्या २१ वर्षांखालील संघाचे प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. रिओ ऑलिम्पिकसाठी वर्षभराचा कालावधी बाकी असताना व्हॅन अ‍ॅस यांचा अनुभव संघासाठी उपयुक्त ठरला असता मात्र बात्रा यांनी वैयक्तिक अहंकाराचा बाऊ केल्याने व्हॅन अ‍ॅस यांची गच्छंती झाली आहे.

ओल्टमन्स यांच्या निवडीची शक्यता
व्हॅन अ‍ॅस परतण्याची शक्यता नसल्याने त्यांच्या जागी रोलँट ओल्टमन्स यांची निवड होण्याची शक्यता आहे. अंतरिम प्रशिक्षक म्हणून कामाचा अनुभव असल्याने त्यांच्या नावाला पसंती मिळेल असा अंदाज आहे.

भारताचे २१ वर्षांतील २१ प्रशिक्षक
केपीएस गिल यांच्या कालावधीतील प्रशिक्षक (१९९४-२००८)
झफर इक्बाल
सेड्रिक डिसुझा (दोनदा प्रशिक्षक म्हणून कार्यभार आणि गच्छंती)
व्ही. भास्करन (पाच वेळा प्रशिक्षक म्हणून कार्यभार आणि गच्छंती)
परगत सिंग
एम. के. कौशिक
हरचरन सिंग
सी. आर. कुमार
राजिंदर सिंग
गेहरार्ड राच
जगबीर सिंग
जोअ‍ॅकिम काव्‍‌र्हालो
रिक चार्ल्सवर्थ

नरिंदर बात्रा यांच्या कालावधीतील प्रशिक्षक
(२०१० पासून)
जोस ब्रासा, हरिंदर सिंग, मायकेल नॉब्स, टेरी वॉल्श, पॉल व्हॅन अ‍ॅस