२२ युवा नौकानयनपटू उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यामुळे भारतीय नौकानयन महासंघ (आरएफआय) अडचणीत सापडले आहे. आपल्यावरील हे आरोप झटकण्यासाठी आता महासंघाने खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या पोषक आहारावर खापर फोडले आहे.

सराव शिबिरादरम्यान भारतीय नौकानयनपटूंना दिल्या जाणाऱ्या पोषक आहाराची आता चौकशी केली जाणार असल्याचे महासंघाचे सरचिटणीस एम.व्ही. श्रीराम यांनी सांगितले.

ते म्हणाले की, ‘‘शरीरातील चरबी कमी करण्यासाठी वापरले जाणारे प्रोबेनसिड हे उत्तेजक या सर्व २२ कनिष्ठ खेळाडूंनी घेतल्याचे सिद्ध झाले आहे. केंद्र सरकारच्या ‘खेलो इंडिया’ या महत्त्वपूर्ण अभियानांतर्गत खेळाडूंना हा पोषक आहार दिला जात होता. गेल्या वर्षी जुलै महिन्यात हैदराबाद येथे ३२ खेळाडूंची उत्तेजक चाचणी करण्यात आली होती. या पोषक आहारामुळेच त्यापैकी २२ खेळाडू दोषी सापडले आहेत. आम्ही याचा तपास करत असून लवकरच पुढील प्रक्रिया पार करून योग्य तो निर्णय घेतला जाईल.’’

‘‘खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या शिक्षेचा आढावा आम्ही घेणार असून नेमके कुठे चुकले याचीही चौकशी करणार आहोत. ‘खेलो इंडिया’तून निवडल्या गेलेल्या भारताच्या कनिष्ठ संघातील खेळाडूंची त्या वेळी चाचणी करण्यात आली होती. यापैकी बऱ्याच जणांनी १८ वय पार केले असून त्यांनी कोणते प्रतिबंधित उत्तेजके  घेतले होते किंवा कोणत्या प्रशिक्षकाने ते घेण्याची शिफारस केली होती, याचीही चौकशी आम्ही करणार आहोत,’’ असे श्रीराम म्हणाले.