19 September 2020

News Flash

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा ‘महासंघ’

कार्यकाळ संपत आलेल्या सदस्यांकडेच संघनिवडीची जबाबदारी देण्याची शक्यता

| September 6, 2020 02:52 am

(संग्रहित छायाचित्र)

कार्यकाळ संपत आलेल्या सदस्यांकडेच संघनिवडीची जबाबदारी देण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डिसेंबरमध्ये होणाऱ्या कसोटी तसेच मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी २३ ते २५ खेळाडूंचा भारतीय ‘महासंघ’ निवडला जाणार आहे. सप्टेंबरमध्ये कार्यकाळ संपत असलेल्या देवांग गांधी, जतिन परांजपे आणि शरणदीप सिंग यांचा समावेश असलेली निवड समितीच भारताची संघनिवड करू शकते, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) विश्वसनीय सूत्रांनी दिली.

गांधी, परांजपे आणि सिंग यांचा निवड समितीमधील कार्यकाळ ३० सप्टेंबर रोजी संपणार आहे, तर ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताची संघनिवड ऑक्टोबरमध्ये करण्यात येणार आहे. मदनलाल शर्मा, रुद्रप्रताप सिंग आणि सुलक्षणा नाईक यांचा समावेश असलेली क्रिकेट सल्लागार समिती यापूर्वी नव्या निवड समितीची नेमणूक करण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे गांधी, परांजपे आणि सिंग यांच्यावरच भारताचा चमू निवडण्याची जबाबदारी राहू शकते.

‘‘करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतातील क्रिकेट अद्यापही ठप्प आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी नव्या निवड समितीची नेमणूक करण्याऐवजी सध्याची समितीच संघनिवड करेल, अशी अपेक्षा आहे. तसेच दौऱ्यादरम्यान एखाद्या खेळाडूला करोनाची लागण अथवा दुखापत झाल्यास अनेक पर्यायी खेळाडू उपलब्ध असावेत, म्हणून भारताच्या चमूत २३ ते २५ खेळाडूंचा समावेश करण्यात येण्याची शक्यता आहे,’’ असे ‘बीसीसीआय’च्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

संयुक्त अरब अमिराती येथे खेळवण्यात येणारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) १० नोव्हेंबरला संपल्यानंतर आठवडय़ाभरात भारताचे खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. ३ डिसेंबरपासून उभय संघांतील बहुप्रतीक्षित चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला प्रारंभ होणार असून त्यानंतर तीन एकदिवसीय सामनेही खेळवण्यात येतील. मात्र पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणे भारत-ऑस्ट्रेलियामध्ये ऑक्टोबर महिन्यात ट्वेन्टी-२० मालिका खेळवण्यात येणार होती. त्या मालिकेच्या आयोजनाबाबत अद्याप अधिकृतपणे अंतिम निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2020 2:52 am

Web Title: 23 to 25 member indian squad expected for australia tour zws 70
Next Stories
1 डायमंड लीग अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा : मो फराह, हसन यांचे विक्रम
2 कौतुकास्पद, पण..!
3 डाव मांडियेला :  हुकुमी डावाची भवानी
Just Now!
X