क्रिकेट हा अनिश्चिततांचा खेळ आहे. कधी एखादा संघ अवाढव्य धावसंख्या उभारतो, तर कधी एखादा गोलंदाज भेदक मारा करत प्रतिस्पर्धी संघाला मोजक्या धावांमध्ये गुंडाळतो. सहसा टी २० क्रिकेटमध्ये अधिकाधिक धावा करण्याच्या प्रयत्नात काही वेळा संघ झटपट माघारी परततो. पण जर तुम्हाला सांगितलं की कसोटी क्रिकेट मध्ये सर्वात कमी धावा करणाऱ्या संघाने केवळ २६ धावाच केल्या आहेत तर… आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वबाद २६ ही एका डावातील सर्वात कमी धावसंख्या आहे.

१९५५ साली एका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संघासोबत लाजिरवाणा प्रसंग घडला होता. १९५५ साली भारताला पहिला कसोटी विजय मिळवून केवळ तीन वर्षे झाली होती. पाकिस्तानला कसोटी क्रिकेट खेळून केवळ दोन वर्षे झाली होती आणि श्रीलंकेचा संघ तर कसोटी क्रिकेट खेळण्यास पात्रही ठरला नव्हता. त्या काळात इंग्लंडने इतिहासात पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात जाऊन अॅशेस मालिका जिंकली. त्यानंतर मनोधैर्य उंचावलेला इंग्लंडचा संघ न्यूझीलंडच्या विरोधात कसोटी मालिका खेळण्यासाठी उभा ठाकला.

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात न्यूझीलंडमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यात येणार होती. न्यूझीलंडचा संघ त्या मालिकेआधी वर्षभरापासून क्रिकेटमध्ये फारसा सक्रिय नव्हता. सतत संघात करण्यात आलेले बदल यामुळे न्यूझीलंडच्या संघातील खेळाडूंची मनस्थितीही ठीक नव्हती. पहिल्या सामन्यात न्यूझींलडने इंग्लंडला खूप झुंजवलं. पण इंग्लंडने पहिला सामना आठ गडी राखून जिंकला. दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावांनंतर न्यूझीलंडचा संघ केवळ इंग्लंडपेक्षा ४६ धावांनी मागे होता. सामना समतोल स्थितीत होता.

दुसऱ्या डावात सगळी समीकरणं बिघडली. खेळ पुढे गेला तशी खेळपट्टी गोलंदाजीसाठी पोषक बनली. न्यूझीलंडचा बर्ट सटक्लिफ वगळता कोणत्याही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. एका सत्रात डाव २६ धावांत आटोपला. पाच फलंदाजांना तर भोपळाही फोडता आला नाही. ६५ वर्षांनंतरही अजूनही हा लाजिरवाणा विक्रम न्यूझीलंडच्या संघाच्याच नावे आहे.

२०१८ मध्ये हा विक्रम इंग्लंडच्या नावे होतो की काय असं वाटलं होतं. कारण न्यूझीलंडने इंग्लंडचे २३ धावांत ८ बळी घेतले होते. पण क्रेग ओव्हरटर्नच्या नाबाद ३३ धावांच्या खेळीमुळे इंग्लंडचा संघ ५८ धावांपर्यंत पोहोचू शकला. त्या सामन्यात इंग्लंडचा एक डाव आणि ४९ धावांनी पराभव झाला होता पण तो लाजिरवाणा विक्रम होण्यापासून इंग्लंडचा संघ वाचला.