करोना व्हायरसमुळे बर्‍याच दिवसांपासून क्रिकेट बंद आहे. मात्र आता क्रिकेट हळूहळू पूर्वपदावर येत आहे. वेस्ट इंडिजचा संघ इंग्लंड दौर्‍यावर असतानाच आता दक्षिण आफ्रिकेतही नव्या ढंगात क्रिकेट पुनरागमन करणार आहे. सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्क मैदानावर २७ जून ला दक्षिण आफ्रिकेतील तीन संघांमध्ये एक सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेतील अनुभवी आणि बडे खेळाडू सामील होणार आहेत. हा सामना इतर क्रिकेट सामन्यांसारखा नसून काहीस वेगळा असणार आहे. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे हा सामना दोन नव्हे तर तीन संघांदरम्यान खेळला जाणार असून त्याचे नियम वेगळे असणार आहेत.

या सामन्यासाठी माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्स, विद्यमान कर्णधार क्विंटन डी कॉक आणि वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडा यांच्या नेतृत्लाखालील तीन संघ खेळणार आहेत. या सामन्याची अधिकृत घोषणा बुधवारी करण्यात आली. हा सामना निधी जमवण्यासाठी खेळण्यात येणार असून यास Solidarity Cup असे नाव देण्यात आले आहे. या सामन्यातून जमा झालेला निधी करोना व्हायरसमुळे अडचणीत सापडलेल्यांना मदत म्हणून दिला जाणार आहे.

सामन्याचे नियम कसे असतील, जाणून घ्या

  • सामन्याच्या नियमांनुसार, प्रत्येक संघात आठ खेळाडू असतील.
  • ३६ षटकांचा हा सामना असेल. त्यात १८ षटकांनंतर ‘ब्रेक टाइम’ घेतला जाईल.
  • एक संघ ६-६ षटकांच्या ब्रेकसह १२ षटके फलंदाजी करेल. त्यातील पहिली सहा षटके एका प्रतिस्पर्ध्याविरुद्ध, तर उर्वरित सहा षटके दुसऱ्या प्रतिस्पर्ध्याविरूद्ध खेळण्यात येतील.
  • संघातील सातवा गडी बाद झाल्यावर नाबाद फलंदाज फलंदाजी करू शकेल, पण त्याला केवळ दुहेरी धाव घेता येईल. एकेरी धाव मोजली जाणार नाही.
  • सामन्याच्या पूर्वार्धात सातपेक्षा कमी गडी बाद झाल्यासच इतर फलंदाज उत्तरार्धात फलंदाजी करू शकतात.
  • गोलंदाजी करताना संघ नवीन चेंडूचा वापर दोन्ही प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध १२ षटकांसाठी करू शकतो.
  • प्रत्येक गोलंदाज जास्तीत जास्त तीन षटके टाकू शकतो.
  • सर्वाधिक धावा करणारा संघ विजेता घोषित केला जाईल.
  • विजेत्या खेळाडूला सुवर्णपदक, उपविजेत्या संघाला रौप्यपदक तर तिसऱ्या क्रमांकावरील संघाला कांस्यपदक प्रदान करण्यात येईल.
  • दोन संघांमध्ये टाय झाल्यास सुपर-ओव्हरने सामन्याचा निर्णय होईल. पण तीनही संघांमध्ये टाय झाल्यास तिघांनाही सुवर्णपदक देण्यात येईल.