नवी दिल्ली : हंगेरीमध्ये २० ते २८ ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी भारताकडून ३० जणांच्या दमदार संघाची निवड करण्यात आली आहे. पुरुष गटात बजरंग पुनिया तर महिला गटात साक्षी मलिक हे भारताचे नेतृत्व करणार आहेत.

भारताने या स्पर्धेसाठी फ्री स्टाईल, ग्रीको रोमन आणि महिला गटात प्रत्येकी १० मल्लांची निवड करण्यात आली आहे. त्यात बजरंग ६५ किलो वजनी गटात, तर साक्षी ६२ किलो वजनी गटामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. जगमिंदर सिंग हे पुरुषांच्या फ्री स्टाईलचे मुख्य प्रशिक्षक, तर महिलांसाठी कुलदीप मलिक यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ३० कुस्तीपटूंसह १७ अन्य पदाधिकारी या संघासमवेत जाणार आहेत. संपूर्ण संघ मंगळवारी सकाळी बुडापेस्टसाठी रवाना होणार आहे.

पदकांची अपेक्षा

भारतीय मल्ल आता ऑलिम्पिक पदकांच्या दृष्टीनेच तयारीला लागलेले असल्याने या स्पर्धेतही ते दमदार कामगिरी करण्याची चिन्हे असून दोन्ही गटांतून पदकाची अपेक्षा आहे.