पाकिस्तानच्या संघाने भारतीय संघाचे नाक कापले, वस्त्रहरण केले, धिंड काढली, अशा उद्वेगजनक भावना भारतीयांच्या मनात आहेत. एरव्ही कोणत्याही संघाने पराभूत केले असते तर एवढा राग, क्षोभ भारतीयांना आला नसता. पण जिथे सामना युद्ध ठरतं, खेळाडू सैनिक ठरतो त्या पाकिस्तानविरुद्धच्या पराभवाचे शल्य नक्कीच भारतीयांना अस्वस्थ करत आहे. पाकिस्तानने काय नाही केलं, त्यांच्या फलंदाजांनी आपल्या गोलंदाजीची लक्तरे वेशीवर टांगत संघाला उघडे पाडले, तर गोलंदाजांनी भक्कम समजल्या जाणाऱ्या भारतीय फलंदाजांना निष्प्रभ करत संघाची ‘पँट’ ही काढली. पहिल्या दोन्ही सामन्यात भारतीय संघाचे वस्त्रहरण झालेले आहे. आता हे वस्त्रहरण थांबवणारा ‘श्रीकृष्ण’ कोण? हा यक्षाने धर्मराजाला विचारलेल्या प्रश्नापेक्षाही मोठा वाटत आहे. मार्गदर्शन आणि योद्धा या दोन्ही रूपांत भारतासाठी श्रीकृष्णाची जबाबदारी सचिन तेंडुलकर सांभाळत होता, पण त्याची जागा नक्कीच कोणीतरी घ्यायला हवी. फिरोझशाह कोटलावरच्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यातील जय-पराजयाला मालिकेच्या दृष्टीने अर्थ नाही, कारण पाकिस्तानने मालिका कोलकात्यातच २-० अशी जिंकली आहे. पण नेहमी सकारात्मक भाष्य करणाऱ्या महेंद्रसिंग धोनी आणि संघासाठी ही एक संधी असेल. भारतीय पांडवानी या मयसभेत जवळपास सारेच गमावले आहे, त्यामुळे आता गमावण्याचे दडपण त्यांच्यावर नसेल. त्यामुळे संघात काही प्रयोग करण्याची संघाला संधी असेल. दडपण नसल्याने बेधडक खेळ भारतीय संघाने करायला हवा, कारण दडपणाच्या ओझ्याखाली भारतीय संघाने मालिका गमावलेली आहे. त्यामुळे मनाचा दुबळेपणा झटकून भारतीय संघ मैदानात उतरला तर विजय मिळण्याची शक्यता जास्त आहे. सध्या चाललेल्या मैदानातील महाभारतात युधिष्ठिर धोनी एकाकी पडल्याचे दिसत आहे, त्याला अन्य सहकाऱ्यांच्या सुयोग्य साथीची अपेक्षा आहे; तर दुसरीकडे तो दुखापतीमुळे या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. पण तो जर खेळला आणि त्याला अन्य सहकाऱ्यांची साथ लाभली तर विजयाचे दान भारताच्या पदरात पडू शकते आणि शेवट तरी गोड होईल; अन्यथा निर्वस्त्र भारतीय संघाला तोंड लपवायलाही जागा मिळणार नाही.
भारतीय संघ कमालीच्या दडपणाखाली वावरताना दिसत आहे, पण संघात बदल होण्याची शक्यता आहे.अजिंक्य राहणेला संधी मिळण्याची शक्यता आहे, पण वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांच्यापैकी वगळायचे कोणाला, हा मोठा प्रश्न असेल. कारण या सामन्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघ निवडण्यात येणार असल्याने त्यासाठी गंभीर आणि सेहवाग यांना अखेरची संधी देण्याची शक्यता जास्त आहे. रोहित शर्मा या सामन्यात खेळणार नसल्याचे जवळपास स्पष्ट आहे. पाठीच्या दुखापतीमुळे धोनी सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. तसे धोनीने बोलूनही दाखवले आहे. धोनी न खेळल्यास दिनेश कार्तिकला संधी देण्यात येईल. पण धोनी खेळला नाही तर कर्णधारपद कोणाला द्यायचे हादेखील मोठा प्रश्न आहे. धोनी खेळत नसला तर सेहवाग, गंभीर किंवा विराट कोहलीला कर्णधारपद देण्यात येऊ शकते. पण हे तिघेही सध्या फॉर्मात नाहीत, त्यामुळे कर्णधारपदाचे त्रांगडे नक्कीच संघ व्यवस्थापनापुढे असेल. धोनीच्या जागी कर्णधार भारताला मिळेलही, पण त्याच्यासारखा फॉर्म असलेला फलंदाज सध्या तरी संघात नाही. त्यामुळे धोनी खेळला नाही तर भारतीय फलंदाजी कमकुवत होऊ शकते. गोलंदाजीमध्ये भारतीय संघात बदल होण्याची शक्यता नाही.
पाकिस्तान संघाचे मनोबल सध्या कमालीचे उंचावलेले आहे, पण तरीही ते गाफील राहणार नाहीत. कारण भारताला चारही मुंडय़ा चीत करायचे त्यांचे ध्येय आहे. फलंदाजीमध्ये नासिर खान भारताची डोकेदुखी ठरला आहे. त्याचबरोबर मोहम्मह हफिझ आणि शोएब मलिक जबरदस्त फॉर्मात आहेत. गोलंदाजीमध्ये जुनैद खान, सइद अजमल आणि मोहम्मद हफिझ चमकदार कामगिरी करत आहेत. त्यामुळे पाकिस्तानच्या संघात जास्त बदल होण्याची चिन्हे नाहीत.
सध्या फॉर्मचा विचार केला तर पाकिस्तानचा संघ भारतापेक्षा नक्कीच सरस आहे. पण कोणत्याही क्षणी मालिकेत पुनरागमन करण्याची भारतीय संघाची कुवत आहे. मालिकेत पराभव झाला असला तरी दिल्ली गमावू नका, अशीच भावना भारतीयांच्या मनात आहे.

प्रतिस्पर्धी संघ
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली, युवराज सिंग, सुरेश रैना, रोहित शर्मा, रविचंद्रन अश्विन, अशोक िदडा, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, अजिंक्य राहणे, रवींद्र जडेजा, अमित मिश्रा.पाकिस्तान : मिसबाह उल हक (कर्णधार), नासिर जमशेद, इम्नान फरहात, महंमद हफीझ, उमर अकमल, युनुस खान, कामरान अकमल, वहाब रियाझ, उमर गुल, अन्वर अली, सईद अजमल, हरीस सोहेल, जुनेद अली, अजहर अली, झुल्फिकार बाबर.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स, स्टार क्रिकेट आणि स्टार क्रिकेट एचडी.
सामन्याची वेळ : दुपारी १२ वाजल्यापासून.